परभणी / प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धनासाठी आणि आपल्याला श्वास घेण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे. आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मतदारसंघात वृक्ष लागवड व संवर्धन अभियान सुरू केले आहे ते कौतुकास्पद असून सर्व परभणीकरांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन खा. संजय जाधव यांनी केले आहे.
आ. डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे वृक्ष लागवड व संवर्धन संकल्प अभियान परभणी विधानसभा मतदार संघात राबविण्यात येणार असून या अभियानाची सुरुवात शहरातील कौस्तुभ मंगल कार्यालय परिसरात शनिवार, दि.२० जुलै रोजी खा. जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी खा. जाधव बोलत होते.
पुढे बोलताना खा. जाधव म्हणाले, जिल्ह्यात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे ती थांबली पाहिजे तसेच नव्याने वृक्षांची लागवड झाली पाहिजे. लोकप्रतिनिधीने वृक्ष लागवडीसाठी घेतलेला पुढाकार हा इतरांना प्रेरणा देणारा आहे अशा शब्दात अभियानाचे कौतुक केले.
यावेळी बोलताना आ. डॉ. पाटील म्हणाले, सध्या वृक्षतोड ही पर्यावरण -हासासाठी व जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरत असल्याने परभणीत वंदनीय बाळासाहेब ठाकरे वृक्ष लागवड व संवर्धन संकल्प अभियान मतदार संघातील नागरिक, विविध संस्था, पर्यावरण प्रेमी व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राबविण्याचा आपण संकल्प केला आहे.
यामध्ये नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेत सहभागी व्हावे असे आवाहन आ. पाटील यांनी यावेळी केले.
या अभियानात आपल्या घरासमोर परिसरात आपल्या घरातील जेष्ठांच्या प्रित्यर्थ, मुलाबाळांच्या वाढदिवसानिमित्त एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, त्यासाठी विविध वृक्षांची रोपे घरी अथवा परिसरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी डॉ. ओमनवार, डॉ.हनुमान भोसले, डॉ. राजगोपाल कालानी, कृ.ऊ.बा.सभापती पंढरीनाथ घुले, डॉ. आहुजा, डॉ.महिंद्रकर, डॉ. संजय बंगाळे, कृ.ऊ.बा.सदस्य रावसाहेब रेंगे यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.