परभणी : परभणी तालुक्यातील पारवा शिवारातील सशस्त्र दरोड्याच्या तपासात सपशेल अपयशी ठरलेल्या जिल्हा पोलिस यंत्रणेसमोर गंगाखेड तालुक्यातील वैतागवाडी शिवारात रविवार १९ जानेवारी रोजी मध्यरात्री दरोडेखोरांच्या धुमाकूळामुळे तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
परळी रस्त्यावरील वैतागवाडी शिवारातील शेत आखाड्यावर रविवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास काही सशस्त्र दरोडेखोरांनी मोठा धूमाकुळ घातला. विशेषत: या आखाड्यावरील एका वृध्द शेतर्कयास बेदम मारहाण केली. पाठोपाठ एका महिलेच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागदागिणे जबरदस्तीने ओढून घेतले. दरोडेखोरांनी एकूण तिघांना मारहाण केली. यावेळी या तिघांपैकी एकाने आरडा ओरडा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा, गप्प बस जास्त ओरडू नकोस असे म्हणत सशस्त्र दरोडेखोरांन बापूराव वैतागे यांच्या डोक्यावर प्रहार केले.
तर दैवशाला वैतागे यांच्या अंगावरील दागिने पळविले. त्यावेळी प्रकाश वैतागे यांच्याकडील रोकड आणि मोबाईलही हिसकावण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत गंभीर जखमी बापूराव वैतागे यांना कुटूंबियांनी व नातेवाईकांनी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, परिविक्षाधीन पोलिस अधिक्षक ऋषिकेश काळे, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पोलिस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, आदित्य लोणीकर, शिवाजी शिंगणवाड, विशाल बुधोडकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली.