सोलापूर : श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे स्वामी समर्थ दर्शनासाठी बाहेरगावचे हजारो भाविक अन् स्थानिक नागरिक येत असतात. ते रंगभवन व पाण्याची टाकी बसस्थानकावर भरउन्हात चटके घेत ताटकळत उभे राहतात. ऊन, वारा आणि पावसाच्या सरी झेलणाऱ्या भक्तांकडून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, त्या बदल्यात ना निवारा, ना पाणी, ना शौचालय, ना सुरक्षा. यामुळे स्वामी भक्तांतून अनेक वर्षांपासून नाराजी वाढत असून, सेवासुविधा देण्याची मागणी होत आहे.
अक्कलकोटला आणि कर्नाटकात जाण्यासाठी सोलापूर शहरात रंगभवन व पाण्याची टाकी या दोन ठिकाणी प्रवाशांना थांबण्यासाठी रस्त्याच्या कडेला खुली जागा आहे. रोज दहा हजारांहून अधिक प्रवासी येथून प्रवास करतात. आगार प्रशासन, महाराष्ट्र शासन, राज्यकर्ते, उद्योगपती हे घटक रोज प्रवाशांचे हाल पाहतात. मात्र, कोणालाच पाझर फुटत नाही. मागील दोन महिने उन्हाचे तापमान वाढत आहे. सध्या ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ऊन आहे. भरदुपारी एकीकडे सूर्य आग ओकत असताना प्रवासी मात्र नाइलाजास्तव बसची वाट पाहात थांबलेले असतात. या दोन ठिकाणी छोटे बसस्थानक अथवा निवारा, पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी होत आहे.
या ठिकाणाहून सोलापूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, चिपळूण, वेंगुर्ला, इचलकरंजी, इंदापूर, पंढरपूर, फलटण, जत अशा विविध डेपोच्या बसगाड्या दररोज ये-जा करीत असतात.रोज किमान दहा हजार प्रवासी प्रवास करतात. अशा ठिकाणी पिण्यासाठी पाणी, थांबण्यासाठी निवाऱ्याची सोय, शौचालय, स्वच्छतागृह अशा सुविधा नाहीत. स्वामी भक्तांसाठी खेदाची बाब आहे, दर गुरुवारी आणि शनिवारी सोलापूरहून येणाऱ्या महिला भक्तांची संख्या मोठी आहे. येथून स्वामी समर्थांशिवाय गौडगाव हनुमानासाठी प्रवास करतात.
सोलापुरात रंगभवन येथे अक्कलकोटचे प्रवासी भर उन्हात चटके घेत एसटी बससाठी ताटकळत असतात.या ठिकाणी सोयीसुविधा तर सोडा सुरक्षेचा प्रश्न फार मोठा आहे. पोलिस, होमगार्ड कोणीच प्रवाशांच्या रक्षणासाठी नसल्याने मोबाइल, पैसे, मंगळसूत्र चोरीच्या घटना घडताहेत. पोलिसांची कटकट आणि कोर्टाचे हेलपाटे नको म्हणून तक्रारी देणे टाळतात. संबंधितांनी भक्तांसाठी निवारा आणि सेवा, सुविधा द्यावी अशी मागणी होत आहे.