25.2 C
Latur
Thursday, June 13, 2024
Homeराष्ट्रीयपतंजली सोनपापडी गुणवत्ता चाचणीतही फेल!

पतंजली सोनपापडी गुणवत्ता चाचणीतही फेल!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या तडाख्यामुळे पतंजली आयुर्वेद लिमिटेड या कंपनीचे संस्थापक रामदेव आणि बाळकृष्ण अडचणीत आले आहेत. दरम्यान, या कंपनीसमोरील अडचणी थांबण्याचेनाव घेत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर आता पतंजलीसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. पतंजली कंपनीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यामुळे उत्तराखंडमधील पिथोरागडच्या न्यायदंडाधिका-यांंनी पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीच्या सहाय्यक व्यवस्थापकासह तीन जणांवर कारवाई केली. तिघांनाही ६ महिन्यांचा कारावास आणि दंड अशा स्वरुपाची कारवाई करण्यात आली.

पाच वर्षांपूर्वी १७ ऑक्टोबर २०१९ रोजी अन्न सुरक्षा निरीक्षकांनी पिथोरागडच्या बेरीनागमधील मुख्य बाजारपेठेतील लीलाधर पाठक यांच्या दुकानाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी या दुकानातील काही खाद्यपदार्थांची तपासणी केली. या तपासणीनंतर त्यांनी दुकानातील ‘पतंजली नवरत्न इलायची सोनपापडी’बाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर दुकानातील सोनपापडीचे काही नमुने त्यांनी गोळा केले. यासह रामनगर येथील ‘कान्हा जी’ या वितरकाला (पतंजली सोनपापडीचे वितरक) आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांना नोटीस बजावली होती.

अन्न सुरक्षा निरीक्षकांनी बेरीनागपाठोपाठ रुद्रपूर, उधम सिंह नगर आणि उत्तराखंडमधील काही दुकानांमधील पतंजली सोनपापडीचे नमुने गोळा केले. अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळांमध्ये या सोनपापडीची तपासणी करण्यात आली. या प्रयोगशाळांनी डिसेंबर २०२० मध्ये राज्याच्या अन्न सुरक्षा विभागाला पतंजलीच्या सोनपापडीची निकृष्ट गुणवत्ता दर्शवणारा अहवाल पाठवला. त्यानंतर व्यावसायिक लीलाधर पाठक, वितरक अजय जोशी आणि पतंजलीचे सहाय्यक व्यवस्थापक अभिषेक कुमार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

आधीच पतंजलीच्या फसव्या जाहिराती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड परवाना प्राधिकरणाला फटकारले होते. न्यायालयाने पंतजलीच्या फसव्या जाहिरांतीप्रकरणी प्राधिकरणाच्या निष्क्रियतेवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता सोनपापडीवरून पतंजलीचे प्रोडक्ट अनुत्तीर्ण झाले आहे. त्यामुळे पतंजलीला याची फार मोठी किंमत मोजावी लागू शकते.

६ महिने तुरुंगवास
सुनावणीनंतर न्यायदंडाधिका-यांनी या तिघांना अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००६ च्या कलम ५९ अन्वये सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. तसेच तिघांनाही अनुक्रमे, ५,००० रुपये, १०,००० रुपये आणि २५,००० रुपयांचा दंड ठोठावला.

उत्पादनाचा दर्जा निकृष्ट
ही कारवाई करताना न्यायालयाने म्हटले आहे की, आमच्यासमोर सादर केलेले पुरावे हे पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट असल्याचे स्पष्ट निर्देश करतात. त्यामुळे अन्न सुरक्षा अधिका-यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे या तिन्ही व्यक्तिंविरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR