29 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रबारामतीत पवार विरुद्ध पवार लढत अटळ?

बारामतीत पवार विरुद्ध पवार लढत अटळ?

बारामतीकर नक्की कोणाला साथ देणार? लढतीची शक्यता गडद

बारामती : देश आणि राज्याच्या राजकाणात महत्वाची भुमिका बजाविणा-या ज्येष्ठ नेते शरद पवार यांची कर्मभुमी म्हणुन बारामतीची देशात ओळख आहे. मात्र,महाविकास आघाडीतून बाहेर पडत उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर बारामतीची राजकीय गणिते कमालीची बदलली आहेत. लोकसभा निवडणुकीतच बारामतीकरांना याची प्रचिती आली. लोकसभेत नणंद भावजयीचा सामना झाल्यानंतर विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात लढत होण्याची गडद शक्यता आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांचा चांगल्या मताधिक्क्याने लोकसभेत विजय झाला. या विजयानंतर शरद पवार गटाचा ‘कॉन्फीडन्स’ वाढला आहे. मात्र, तुलनेने युगेंद्र पवार नवखे आहेत. शिवाय बारामती शहर आणि तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांवर उपमुख्यमंत्री पवार यांची मजबूत पकड आहे. त्यामुळे यूगेंद्र पवार यांना उपमुख्यमंत्री पवार यांच्या आव्हानाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे.

लोकसभेचा गड राखण्यात महत्वाची रणनीती आखणा-या थोरल्या पवारांची विधानसभा रणनीती देखील या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे. सध्या ज्येष्ठ नेते शरद पवार राज्यातील रणनीती, पक्षप्रवेश यामध्ये व्यस्त आहेत. अद्याप त्यांनी बारामतीची उमेदवारी जाहीर केलेली नाही. मात्र, लवकरच बारामतीची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ज्येष्ठ नेते पवार बारामतीच्या कर्मभुमीत लक्ष घालण्याची शक्यता आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र युगेंद्र पवार यांना विधानसभेसाठी पाठबळ देण्यास सुरवात केली आहे.

बारामतीत आजही पवार कुटुंबातील निर्माण झालेली दरी सर्वसामान्य बारामतीकरांना आवडलेली नाही. मात्र, दोघांपैकी एकाची निवड अटळ असल्याने बारामतीकर हतबल आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात दोन्ही पवारांना मानणारा मोठा मतदार आहे. सन २००९ पासून लोकसभेला ‘ताई’ आणि विधानसभेला ‘दादा’ असे सुत्र बारामतीकरांनी नेहमीच व्यक्त केले आहे. लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा पवार यांचा लोकसभेचा पराभव अजित पवारांच्या जिव्हारी लागला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी पक्ष पदाधिका-यांचे राजीनामे घेत बुथ कमिटीची नव्याने पुनर्रचना केली.

सुरवातीला उपमुख्यमंत्री पवार यांनी विविध वक्तव्यांमधुन जाहीर सभांमधून स्वत:च्या उमेदवारीबद्दल संभ्रम निर्माण केला. मात्र, कार्यकर्ते हट्टाला पेटल्याने अखेर अजित पवार यांची बारामतीतून उमेदवारी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी यापुर्वीच जाहीर केली. उपमुख्यमंत्री पवार यांच्या जनसन्मान यात्रेला युगेंद्र पवार यांनी स्वाभिमानी यात्रा काढत बारामती मतदारसंघ पिंजुन काढला आहे. मोठ्या प्रमाणात राजकीय दौरे, जनसंपर्क कार्यक्रम देखील त्यांनी सुरुच ठेवले आहेत. तर उपमुख्यमंत्री पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी स्वत: लक्ष घालत पार्थ पवार आणि जय पवार यांच्या दोन्ही मुलांसमवेत निवडणुकीची सुत्रे हाती घेतली आहेत.

तसेच अजित पवारांनी गावनिहाय बुथकमिटी कार्यकर्ता मेळावे घेत संवाद साधला. पुन्हा पक्षाची मोट बांधण्याचा प्रभावी प्रयत्न केला. लोकसभेत भावनिकतेचा मुद्दा चांगलाच गाजला. आता विधानसभेत थोरले पवार कोणती रणनीती आखणार, यावर निवडणुकीची दिशा ठरणार आहे.

लोकसभेची पुनरावृत्ती टळणार का?
राजकारणात वेगवेगळी भुमिका घेणारे पवार कुटुंबीय प्रत्येक दिवाळी सण एकत्र साजरा करतात. यंदाची दिवाळी देखील त्या परंपरेला अपवाद ठरणार नसेल, अशी चिन्हे आहेत. विशेषत: दिवाळी पाडवा, भाऊबीजेला पवारांच्या कुटुंबातील सर्वच ज्येष्ठ यावेळी एकत्र येतात. त्यामुळे लोकसभेची पुनरावृत्ती टळणार का, विधानसभेत देखील पवार विरुध्द पवार निवडणूक होणार का, याबाबत देखील कौटुुंबिक चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवाळीनंतरच ४ नोव्हेंबरला अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे पवार कुटुंंबियांची यंदाची दिवाळी महत्वाची ठरणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR