नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी आपली संपूर्ण ताकद प्रचारासाठी झोकून दिली आहे. यातच लोकनीती सीएसडीएसच्या सर्व्हेमधून धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. दोन टर्म यशस्वीपणे पूर्ण करणारे मोदी सरकार पुन्हा एकदा अर्थात सलग तिस-यांदा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे, महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्यावरून लोक सरकारवर नाराज असले तरी, ते भाजपच्याच बाजूनेच मतदान करणार असल्याचे सांगत आहेत. हा सर्व्हे १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात होणा-या मतदानाच्या ३ आठवडे आधी करण्यात आला आहे.
पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून नरेद्र मोदी यांना लोकांची पहिली पसंती आहे. याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे राम मंदिर. याशिवाय, राहुल गांधी यांना पंतप्रधान पदावर पाहू इच्छिना-यांची संख्या फार कमी असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या तुलनेत तब्बल १२ टक्के लोकांची एनआयएला मतदान करण्याची इच्छा आहे. २०१९ मध्ये, उत्तर मध्य भारत आणि पश्चिम भारतातील हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या होत्या. मात्र, दक्षिण भारतात काँग्रेसलाच अधिक जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजपची कामगिरी आणखी चांगली होऊ शकते. हिंदी भाषिक राज्यांमध्ये आपली पकड कायम ठेवण्याबरोबरच पक्षाने दक्षिण भारतातही आपला मतदार उभा केला आहे. कर्नाटक वगळता दक्षिण भारतातील इतर राज्यांमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी काँग्रेसच्या तुलनेत कमी आहे, मात्र, त्यात पूर्वीच्या तुलनेत निश्चितपणे सुधारणा अपेक्षित आहे.
मोदी सरकारचे रिपोर्ट कार्ड
या सर्वेक्षणात ५० टक्क्यांहून अधिक लोकांनी सरकारच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. तर ४० टक्के लोक सरकारच्या कामावर असमाधानी आहेत. २०१९ च्या तुलनेत सरकारच्या कामकाजावर समाधानी असलेल्या लोकांच्या संख्येत ८ टक्क्यांनी घट झाली आहे. बेरोजगारी आणि महागाईबाबत लोक सरकारवर नाराज असून गरीब लोकांमध्ये अशा लोकांची संख्या अधिक आहे.