जालना : बीडसह राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. काही जाळपोळींच्या घटनाही घडल्या आहेत. याची झळ आमदार प्रकाश सोळंके, प्रशांत बंब आणि संदीप क्षीरसागर यांना बसली आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले की, मी मराठा समाजाला साखळी उपोषण आणि आमरण उपोषण करण्यास सांगितले होते. मराठा समाज जे सांगेल ते काम मी करत आहे. मराठा समाजाचे आंदोलन शांतते सुरू असताना हे कोण करत आहे, ही शंका येते आहे. जाळपोळ करणारे बहुतेक सत्ताधाऱ्यांचेच कार्यकर्ते असल्याचा संशय आहे. बहुतेक सत्ताधाऱ्यांची लोक जाणून बुजून त्यांचीच घरे, त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून जाळून घेऊ लागलेत, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी कितीही धिंगाणा घातला तरी आपण उपोषण थांबवणार नाही.
मराठा समाजाने शांत रहावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. ते म्हणाले की, सर्वाना माझी हात जोडून विनंती, आज रात्री आणि उद्या दिवसा कुठेही जाळपोळ कानावर येऊ देऊ नका. आंदोलन शांततेत सुरू आहे, ते पूर्ण करायचे आहे. आपण कुणाच्याही दारात जायायचे नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, बीडमध्ये अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक आणि आवारातील वाहनांना आग लावण्याची घटना समोर आली. त्यानंतर आता बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय ‘राष्ट्रवादी भवन’ पेटवून दिले असल्याची घटना समोर आली आहे. त्याशिवाय, मराठा आंदोलकांनी राजकीय पक्षांशी संबंधित हॉटेल, संस्थांच्या कार्यलयाच्या जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.