जालना : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जालना लोकसभा मतदारसंघात माझा पराभव झाला. माझ्या या पराभवाबद्दल अनेक चर्चा केल्या जातात. मला याने पाडले, त्याने काम केले नाही. पण मला माहीत आहे, मला जनतेने नाकारले आहे. त्यामुळे आता पक्षाकडे काहीही मागणार नाही, पक्ष देईल ती जबाबदारी आनंदाने पार पाडेल. अशा शब्दांत माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री पदासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.
भाजपमध्ये एखाद्या पदाबद्दल जाहीरपणे इच्छा व्यक्त करणे किती महागात पडते हे रावसाहेब दानवे चांगले ओळखून आहेत. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून तुमचे नाव समोर आले तर काय भूमिका असेल? या पत्रकारांच्या गुगलीवर दानवे यांनीच षटकार ठोकल्याची चर्चा या निमित्ताने रंगली आहे.
फुलंब्री येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.
राज्याचे मुख्यमंत्रिपद रिकामे नाही, त्यामुळे मी त्या पदाचा चेहरा म्हणून समोर जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे म्हणत दानवे यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले.
महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी. ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात त्यांनी भूमिका स्पष्ट केली की महायुती मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे सांगत मराठा आरक्षणाचा चेंडू महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे टोलवला.