30.7 C
Latur
Wednesday, April 2, 2025
Homeमहाराष्ट्रमोदींनी कधी निवृत्त व्हावे हे जनता ठरवेल

मोदींनी कधी निवृत्त व्हावे हे जनता ठरवेल

चंद्रशेखर बावनकुळे यांचा संजय राऊतांना टोला

मुंबई : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राउत यांनी केले होते. याला प्रत्युत्तर देताना महसूलमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

भारतीय लोकशाहीत पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचे, हे संजय राऊत यांच्यासारख्या सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही, तर जनादेशावर आणि लोकांच्या आशीर्वादावर ठरते, असा टोला त्यांनी लगावला. संजय राऊत यांचे विधान ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे. ७५ वर्षे वयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारण सोडावे असा कोणताही नियम नाही किंवा असा कुठलाही निर्णय झालेला नाही. भाजपच्या कोणत्याही अधिकृत धोरणातही असे म्हटलेले नाही. भारतीय संविधानातही असा कोणताही ठराव किंवा नियम नाही. भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी वयाच्या ७९ वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. तर मोरारजी देसाई(८३) आणि डॉ. मनमोहनसिंग तर वयाच्या ८१ वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. पण मानसिक संतुलन बिघडल्याने भाजप द्वेषाची कावीळ झालेल्या राऊतांना हे आठवणार नाही.

भारतीय लोकशाहीत पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचे, हे संजय राऊत यांच्यासारख्या सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही, तर निवडणुकीतील जनादेशावर आणि लोकांच्या आशीर्वादावर ठरते. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ या देशातील जनता ठरवते, संजय राऊत किंवा विरोधकांना तो अधिकार नाही. २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदीजींनी केला आहे. हा संकल्प त्यांच्याच नेतृत्वात पूर्ण केला जाईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

तेवढी तुमची कुवत नाही : चित्रा वाघ
सर्वज्ञानी संजय राऊत म्हणजे उबाठा सेनेचा पोपट आहे. उबाठांनी पाळलेल्या या पोपटाने आता भाकड भविष्य सांगायला सुरूवात केली आहे. माझे एकच सांगणे आहे, या स्वयं घोषित विश्वगुरूने स्वत:च्या घराकडे आधी लक्ष द्यावे. भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी वगैरेंवर बोलण्याची एकतर त्यांची कुवत नाही, आणि तुमच्या विश्लेषणाची आमच्या पक्षाला गरजही नाही. भाजपचा पुढचा वारसदार वगैरेच्या गोष्टी बोलण्यापेक्षा जरा स्वत:च्या पक्षाला माफ करा गटाला पडलेले खिंडार सांभाळा असा टोला भाजप महिला प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR