गोंदिया : चॅटजीपीटी’च्या नवीन ‘घिबली’ इमेज जनरेटरने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. केंद्रातील नेत्यांपासून, मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि उद्योजकांपासून सामान्यांपर्यंत सगळ्यांनाच घिबली इमेजमध्ये आपला फोटो असावा असे वाटत आहे. तुम्हीही याच्या मोहात पडला असाल ना। थोडं थांबा, कारण या फोटोच्या नादात तुमची खासगी माहिती तर कोणी चोरत नाही ना, याचा विचार करून योग्य ती खबरदारी घ्या असे आवाहन तज्ज्ञ करत आहेत.
सायवर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपण आपल्या वैयक्तिक माहितीचा अॅक्सेस थर्ड पार्टी अॅपला देत आहोत. त्यामुळे आपली खासगी माहितीच नाही तर आपले फोटोदेखील संबंधित एआय टूल्सला सहजतेने मिळत आहेत. ती माहिती चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागली तर संपूर्ण माहिती आपल्या चेह-यासह डार्क वेबला विकली जाऊ शकते. लॅपटॉप, कॉम्प्युटर यापेक्षा मोबाइलद्वारेच अनेक गोष्टींचा वापर शक्य झाला आहे.
मोबाइलमध्ये अॅप इन्स्टॉल केल्यानंतर आपण ऑल परमीशन्स देतो, अॅपचे अॅग्रिमेंट कोणी वाचत नाही. त्यामुळे मोबाइलमधील वैयक्तिक माहिती, कॉन्टॅक्ट नंबर, फोटो थेट अॅपकडे आते. त्यात घिवलीमध्ये आपण आपला फोटो अपलोड करतो, चेहरा म्हणजेच आपली ओळख असते.
….तर गंभीर परिणाम होतील
अनेक कंपन्यांमध्ये फेस रीडिंगद्वारेच कर्मचा-यांची हजेरी नोंदविली जाते. घिबली किंवा इतर कोणतीही एआय इमेज तयार करण्यासाठी आपल्याला आपला फोटो एआय प्रणालीसोबत शेअर करावा लागतो. ही वैयक्तिक बायोमेट्रिक माहिती म्हणजेच आपल्या चेह-याची ओळख एआय कंपन्यांना आपणच देत असतो. ही गोष्ट पासवर्ड किंवा क्रेडिट कार्ड नंबर चोरीला जाण्यापेक्षाही जास्त धोकादायक मानली जाते. कारण पासवर्ड बदलता येतो; पण चेहरा बदलता येत नाही. तुमच्या चेह-याचा डेटा चोरीला जाऊन त्याचा गैरवापर होऊ शकतो.
डार्क वेब म्हणजे काय?
डार्क वेब इंटरनेटचा असा भाग आहे जिथे फक्त गैर अथवा अनधिकृत धंदे चालतात. आपण जे इंटरनेट वापरतो तो वेबच्या एकूण जगाचा फारच लहान भाग आहे. पुढे आलेल्या एका माहितीनुसार, ९० टक्के इंटरनेट आजही लपलेले आहे, त्यालाच डार्क वेब असे म्हणतात. डार्क वेबमध्ये सर्व प्रकारच्या पेजचा समावेश आहे जे सर्च इंजिन शोधू शकत नाही.
विशेष काळजी घ्यावी
एखाद्या नेत्याचे वक्तव्य मोडतोड करून, त्यांच्याच चेह-यावर त्यांच्याच आवाजात हुबेहूब व्हीडीओद्वारे प्रसारित होऊ शकते अनेक राजकीय नेतेमंडळींच्या सोशल मीडियावर ‘घिबली’चे फोटो दिसत आहेत. ‘एआय’चा वापर लोकांची फसवणूक करण्यासाठीदेखील केला जाऊ शकतो. आवाज आणि फोटो घेऊन ‘एआय’च्या माध्यमातून पाहिजे तो व्हीडीओ बनवला जाऊ शकतो. अॅपद्वारे जाहिराती बनवून बदनामी केली जाऊ शकते. अॅप्लिकेशन्स वापरताना अत्यंत काळजी घेणे गरजेचे असल्याचे सायबर सेल प्रमुख अशोक गेडाम यांनी सांगितले.