संभाजीनगर : औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं, तर उस्मानाबाद जिल्ह्याचंही नाव धाराशिव केले आहे. राज्य सरकारने (१५ सप्टेंबर) राजपत्र प्रकाशित करुन दोन्ही जिल्ह्याचे नाव बदलले. मात्र, आता सरकारच्या याच निर्णयाला पुन्हा नव्याने आव्हान देण्यात आले आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचे, तालुक्याचे आणि गावाचे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे अधिकृतपणे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात नव्याने आव्हान देण्यात आले. या याचिकांवरील सुनावणी उच्च न्यायालयात २९ सप्टेंबर रोजी होणार आहे. राज्य सरकारने १५ सप्टेंबरच्या रात्री दोन्ही जिल्हे व महसुली कार्यक्षेत्राचे अधिकृतपणे नामांतर केले होते.
विशेष म्हणजे यापूर्वी घेण्यात आलेल्या निर्णयावेळी औरंगाबाद विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गाव तसंच उस्मानाबाद जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गावाचं नाव बदललेलं नव्हतं. ते १५ सप्टेंबर रोजी राजपत्र जारी करुन बदलण्यात आलं आहे. पण आता या निर्णयाच्या विरोधात देखील आव्हान देण्यात आले असून, २९ सप्टेंबर रोजी यावर सुनावणी होणार आहे.