नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांचा नफा वाढला आहे. यातून कंपन्या ग्राहकांना दिलासा देऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास पेट्रोल आणि डिझेल २ ते ३ रुपयांनी स्वस्त होऊ शकते. परंतु केंद्र सरकार याबाबत निर्णय घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परंतु सध्याचा निवडणुकांचे वातावरण लक्षात घेऊन केंद्र सरकार निर्णय घेईल, असे सांगण्यात येत आहे.
रेटिंग एजन्सी एसीआरएच्या मते भारताने आयात केलेल्या कच्च्या तेलाची किंमत सप्टेंबरमध्ये सरासरी ७४ अमेरिकन डॉलर प्रतिबॅरलपर्यंत खाली आली. या अगोदर मार्च महिन्यात हा दर ८३-८४ अमेरिकन डॉलर प्रतिबॅरल होता. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील वर्षी २ रुपयांनी कपात करण्यात आली होती. भारतीय पेट्रोलियम विपणन कंपन्यांसाठी ऑटोमोटिव्ह इंधनाच्या किरकोळ विक्रीवरील मार्केटिंग मार्जिन अलिकडच्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने सुधारले आहे. कच्च्या तेलाच्या किमती सध्याच्या पातळीवर स्थिर राहिल्यास किरकोळ इंधनाच्या किमती कमी होण्यास वाव आहे, असा रेटिंग एजन्सीचा अंदाज आहे.
दोन वर्षापासून बदल नाही
लोकसभा निवडणुकीच्या काळात देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात झालेली कपात वगळता गेल्या दोन वर्षापासून इंधनाच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीत. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर कमी होतील, असे सांगितले जात आहे. भारत तेल आयात करणारा जगातील सर्वांत मोठा तिसरा देश आहे. तेलाची गरज भागवण्यासाठी भारत ८७ टक्के विदेशी स्त्रोतांवर अवलंबून आहे. सध्या कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरू आहे.