मुंबई : सध्या सबंध राज्यभर खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी सुरू असून आतापर्यंत ९ लाख हेक्टरवरील पिकांची नोंद झाली आहे. गेल्या उन्हाळी हंगामात ही नोंदणी करताना प्रत्यक्ष शेतातील फोटो काढण्यासाठी प्रत्यक्ष लागवडीपासून ५० मीटरची अट आता २० मीटर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतक-यांच्या पीक लागवडीची अचूक माहिती मिळणार आहे.
तसेच ऍपवर नोंदणी करताना पूर्वी वारंवार ओटीपी द्यावा लागत होता. आता एकदाच ओटीपी टाकावा लागणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्या वतीने खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करण्याासटी आता डिजिटल क्रॉप सर्व्हे(डीसीएस) या मोबाईल ऍपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शेतकरी स्तरावरील ही नोंदणी एक ऑगस्टपासून भरण्यास सुरुवात केली असून अंतिम मुदत १५ सप्टेंबर आहे.
अचूकता मर्यादा वाढली
गेल्या वर्षी उन्हाळी हंगामात या ऍपद्वारेच पिकांची नोंदणी केली होती. तेव्हा पिकाचा फोटो काढण्यासाठी प्रत्यक्ष लागवड केलेल्या क्षेत्राच्या ५० मीटरच्या आतील फोटो ऍपकडून स्वीकारला जात होता. आता यात बदल केला. ही मर्यादा आता २० मीटर इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे पीक नोंदणी करताना अधिक अचूकता येणार असल्याची माहिती ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली.
एकदाच ओटीपी टाकून नोंदणी होणार
यापूर्वी नोंदणी करताना मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी अनेकदा टाकावा लागत होता. आता एकदाच ओटीपी टाकून नोंदणी पूर्ण करता येईल. शेतक-यांनी नोंदणी केल्यानंतर माहितीतील दुरुस्ती करण्यासाठी पुढील ४८ तासांची मुभा दिली आहे. तसेच नोंदणी करताना इंटरनेट नसले तरी ती अपलोड करता येणार आहे असेही त्यांनी सांगितले.
सर्वाधिक नोंदणी छत्रपती संभाजीनगरात
राज्यात आतापर्यंत ९ लाख ५७ हजार १७७ शेतक-यांनी २ लाख २ हजार ८३० हेक्टरवरील पिकांची नोंद या ऍपच्या माध्यमातून केली आहे. त्यात सर्वाधिक २ लाख ५० हजार ७१६ हेक्टरवरील पिकांची नोंदणी संभाजीनगर विभागात झाली आहे. कृषी विभागाने यंदा १ जूनपासून पीक विम्यासाठी ई-पीक पाहणी नोंदणी बंधनकारक केली आहे.
विभागनिहाय नोंदणी
विभाग – नोंदणी केलेले शेतकरी – क्षेत्र (हेक्टर)
अमरावती – १४३२६० – १८१८५५.९२
कोकण – ४४४१४ – २८२६७.०५
संभाजीनगर – २७३४३५ – २५०७१६.१९
नागपूर – १८९३४५ – १७१६०६.१२
नाशिक – १७०४७४ – १६१५४५.०९
पुणे – १३६२३९ – १०८८३९.६३
एकूण – ९५७१७७ – २०२८३०