नवी दिल्ली : भारतात यापुढे पिंक बॉल टेस्ट सामने खेळवले जाणार नाहीत असे गृहीत धरावे लागणार आहे. कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय कधीही पिंक बॉल टेस्टच्या बाजूने नव्हते. जगभर पिंक बॉलच्या प्रकाशाखाली कसोटी सामने खेळले जात असतानाही भारताने त्यात जास्त रस दाखवला नव्हता. यामुळेच टीम इंडियाने आतापर्यंत फक्त ४ डे -नाईट टेस्ट सामने खेळले आहेत.
वृत्तानुसार, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, भारतीय बोर्ड आता पिंक बॉलच्या कसोटीसाठी उत्सुक नाही, कारण ४ किंवा ५ दिवस चालणारे सामने फक्त २ ते ३ दिवसांत संपतात.
जय शाह पुढे म्हणाले की, पिंक बॉलची कसोटी लोकांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी बीसीसीआयकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पण आतापर्यंत पिंक बॉलने खेळल्या जाणा-या सर्व टेस्ट अवघ्या २-३ दिवसात संपल्या आहे. तर लोकांना ४ ते ५ दिवस कसोटी सामने पाहायला आवडतात, ज्याची त्यांना सवय आहे. शाह म्हणाले की, पिंक बॉलची कसोटी ऑस्ट्रेलियात शेवटची खेळली गेली होती, त्यानंतर कोणत्याही देशाने त्याचे आयोजन केले नाही.
टीम इंडियाने आत्तापर्यंत ४ पिंक बॉल टेस्ट खेळल्या आहेत, त्यापैकी ४ जिंकल्या आहेत तर एकात पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध शेवटची पिंक बॉल टेस्ट खेळली होती, जी ३ दिवसात संपली.
भारतीय महिला क्रिकेट संघाविषयी बोलायचे झाले तर, त्यांनी आत्तापर्यंत २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त एक पिंक बॉल टेस्ट खेळली होती. क्वीन्सलँडमध्ये खेळलेली ती कसोटी अनिर्णित राहिली होती.
बीसीसीआय सचिवांच्या या वक्तव्यानंतर असे वाटत आहे की, भारत आता पिंक बॉल टेस्ट खेळणार नाही. भारतीय पुरुष संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यावर आहे, जिथे त्यांना २६ डिसेंबरपासून २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दोन्ही कसोटी लाल चेंडूने खेळल्या जातील.