मुंबई :
महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या आणि महत्त्वाची भूमिका बजावणा-या गुलाबी रंगाची भुरळ सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पडल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता हाच गुलाबी रंग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आवडल्याचे पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेनंतर अजित पवारांनी गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान करण्यास सुरुवात केली. ज्यानंतर यांची सर्वत्र चर्चा रंगली. त्यामुळे या रंगाला राज्याच्या राजकारणात विशेष महत्त्व मिळाले आहे.
काही महिन्यांपूर्वी राज्यातील महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली. या योजनेमुळे राजकारणात अनेक मोठे बदल पाहायला मिळाले. लाडक्या बहिणींना त्यांच्या भावांकडून म्हणजेच राज्य सरकारकडून मिळालेली मदत व्यर्थ न जाऊ देता, त्यांना पुन्हा सत्तेच्या गादीवर बसवले. परंतु, या सर्वांत चर्चा रंगू लागली ती म्हणजे गुलाबी रंगाची. कारण या गुलाबी रंगाला थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घालायला सुरुवात केली.
याआधी आपण सर्वांनीच पाहिले आहे की, मंत्र्यांनी, नेतेमंडळींनी हिरवा (पिस्ता रंग), निळे, लाल, काळे किंवा अन्य कोणत्याही रंगाचे जॅकेट घातलेले आहे. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे राजकारणात गुलाबी जॅकेट घालण्याची परंपरा सुरू झाली आहे. पण अजितदादांनी केवळ गुलाबी रंगाचे जॅकेटच नाही घातले तर राष्ट्रवादीच्या निवडणुकांच्या सभांमध्ये सुद्धा हा गुलाबी रंगच पाहायला मिळाला.
कारण प्रचाराचा रथ गुलाबी रंगाचा, झेंडे गुलाबी रंगाचे, बॅनर गुलाबी रंगाचे, इतकेच काय तर प्रचारामध्ये सहभागी होणा-या महिलांनी साड्या सुद्धा गुलाबी रंगाच्याच घातल्या होत्या. पण याच गुलाबी रंगाने महायुतीला तारले असून पुन्हा एकदा राज्यात त्यांचीच सत्ता आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
कारण अजित पवारांनंतर फडणवीसांनी सुद्धा गुलाबी रंगाच्या जॅकेटला पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे. कारण बहुतांश वेळा किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये निळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसणारे देवेंद्र फडणवीस यंदाच्या शपथविधी सोहळ्यात गुलाबी रंगाचे जॅकेट घालून पाहायला मिळाले. त्यानंतर ते विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनातही गुलाबी रंगाचे जॅकेट घालून आले. त्यामुळे विरोधकांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोले लगावले. पण हे टोले अजितदादांना फारसे न रुचल्याचे पाहायला मिळाले. ज्यामुळे विशेष अधिवेशनाच्या तिस-या दिवशी त्यांनी गुलाबी जॅकेटवरून डिवचणा-या विरोधकांना खडेबोल सुनावले.
विशेष अधिवेशनाच्या तिस-या म्हणजेच शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. ९ डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुलाबी रंगाचे जॅकेट घातले होते. पण यावरून विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असताना त्यांना डिवचण्याचे काम केले. ज्यामुळे संतापलेल्या अजितदादांनी म्हटले की, ‘‘गुलाबी जॅकेट आज मुख्यमंत्र्यांना दिले आहे. काय अडचण आहे? आता तुम्हाला रंगही कळत नाही. रंगही विसरायला लागले. काय करायचे काय? आम्ही कोणते जॅकेट घालायचे हे आम्ही ठरवू. तुम्हाला कोणते जॅकेट घालायचे ते तुम्ही ठरवा,’’ असे अजित पवारांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.