23.4 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeमहाराष्ट्रपिंक रिक्षा योजना आता प्रत्येक जिल्ह्यात

पिंक रिक्षा योजना आता प्रत्येक जिल्ह्यात

राज्य सरकारची घोषणा

मुंबई : महिलांना स्वयंरोजगारासाठी ई-पिंक रिक्षा योजनेचा विस्तार, श्री ज्योतिबा मंदिर व परिसर विकास उत्कर्ष प्राधिकरणाची स्थापना, संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे विकास आराखडा तयार करून त्यास आवश्यक निधी देणार, अशा अनेक घोषणा उपमुख्यमंत्री वित्तमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केल्या.

यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथील शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेस २ कोटींचा निधी, जावळी तालुक्यातील शहीद तुकाराम ओंबाळे स्मारकास निधी, कोयना येथील मुनावळे येथे जल पर्यटनासाठी निधी देणार, अशा घोषणा अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना पवार यांनी केल्या. समाजातील विविध घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प सादर केल्याने आपण समाधानी आहोत आणि राज्यातील जनताही खुश आहे असे ते म्हणाले.

महिला, बालकल्याण राखीव निधीतून तरतूद
अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वयंरोजगार निर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी १० हजार ‘पिंक ई-रिक्षा’ खरेदी योजनेची घोषणा केली आहे. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार या योजनेचा विस्तार जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महिला व बालकल्याणासाठी राखीव ३ टक्के निधीतून जिल्हा व तालुका स्तरापर्यंत करण्यात येईल. यामधून प्रत्येक जिल्ह्यात ५०० पिंक ई-रिक्षा उपलब्ध करून देण्यात येतील, असे पवार यांनी सांगितले.

श्री ज्योतिबा मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना
वाडी रत्नागिरी श्री ज्योतिबा मंदिर परिसर व त्याच्या आजूबाजूच्या डोंगराच्या परिसरातील गावांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी शासनस्तरावर कार्यवाही सुरू असून श्री ज्योतिबा मंदिर व परिसर विकास उत्कर्ष प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे.

श्री निवृत्तीनाथ महाराज समाधीस्थळास निधी
जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी संप्रदायातील संतांचे मोठे गुरूबंधू मानले जातात. त्यांचे समाधीस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे विकास आराखडा तयार करून त्यास आवश्यक निधी देण्यात येईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR