परभणी : मागील विधानसभा निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्षाने दगा दिला. त्यानंतरही मित्र पक्ष म्हणून सोबत असताना उपेक्षित ठेवले. परंतु गंगाखेड विधानसभेच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आ. रत्नाकर गुट्टे यांच्या रूपाने तुम्ही आमदार दिला. येत्या निवडणुकीचा विचार करता भाजपने परभणी व माढ्याची जागा आमच्या पक्षाला दिल्यास आम्ही युती धर्म पाळू असे प्रतिपादन रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे.
परभणी शहरातील श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालयात सोमवार दि. ११ मार्च रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचा निर्धार मेळावा पार पडला. याप्रसंगी रासपचे संस्थापक अध्यक्ष जानकर बोलत होते. यावेळी आ. डॉ. रत्नाकर गुट्टे, रासपचे राष्ट्रीय सचिव कुमार सुशील, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, प्रदेश सचिव ज्ञानेश्वर सलगर, सरचिटणीस विलास गाढवे, गणेशराव रोकडे, विष्णू सायगुंडे, परभणी मनपाचे माजी आरोग्य सभापती सचिन देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना रासपचे संस्थापक अध्यक्ष जानकर म्हणाले की, पक्षाची नाळ ही सर्वसामान्यांशी जुळलेली आहे. त्यामुळे वंचितांना सत्ता मिळावी हाच उद्देश आहे. महायुतीशी आमचे जुने नाते आहे. परंतू स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर मात्र आमची उपेक्षाच झाली. त्यांनी यावेळी सांगितले. लोकसभा निवडणुक स्वत:च्या चिन्हावरच लढवण्याचा विचार केला आहे. परभणीकरांनी सेवेची संधी दिल्यास लोकसभा मतदारसंघ विकासाच्या दृष्टीने देशात ओळखला जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. परभणी लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रीय समाज पक्षाला महायुतीने सोडावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचे आ. गुट्टे यांनी सांगितले. तसे झाले नाही तर आम्ही वेगळा विचार करू असेही आ. गुट्टे यांनी यावेळी स्पष्ट केले.