कोलकाता : काठमांडूहून इस्तंबूलकडे झेपावलेल्या टर्किश एअरलाईन्सच्या विमानात तांत्रिक बिघाडामुळे आगीचा थरार पाहायला मिळाला. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एका इंजिनने पेट घेतल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखत वैमानिकाने तत्काळ कोलकाता एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि विमानाचे कोलकाता विमानतळावर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. वैमानिकाच्या या तत्परतेमुळे विमानातील शेकडो प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत.
टर्किश एअरलाईन्सचे टीएचव्हाय ७२७ हे विमान काठमांडूहून इस्तंबूलच्या दिशेने जात होते. विमान कोलकाता हवाई हद्दीत असताना अचानक एका इंजिनमध्ये बिघाड झाला आणि त्यातून आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. विमानात आग लागल्याची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, वैमानिकाने गोंधळून न जाता तातडीने आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. कोलकाता विमानतळ प्राधिकरणाने घटनेचे गांभीर्य ओळखून धावपट्टी रिकामी केली आणि विमानाला उतरण्याची परवानगी दिली.
प्रवासी सुरक्षित, दुरुस्तीचे काम सुरू
विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सध्या सर्व प्रवासी विमानतळाच्या वेटिंग एरियामध्ये असून, तांत्रिक पथकाकडून विमानाच्या इंजिनची तपासणी आणि दुरुस्ती केली जात आहे. इंजिनमध्ये आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
विमानतळावर घटनांची मालिका
गेल्या काही दिवसांपासून विमानतळांवर आपत्कालीन लँडिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच वाराणसीमध्ये इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची चिठ्ठी सापडल्याने खळबळ उडाली होती. त्या घटनेतही विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते, मात्र तपासणीत काहीही संशयास्पद आढळले नव्हते. आता थेट विमानाच्या इंजिनने पेट घेतल्याची घटना समोर आल्याने विमान प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

