नवी दिल्ली : टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये न्यूझिलंडचा ७० धावांनी धुव्वा उडवत विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला आहे. या सामन्यात मोहम्मद शामीने शानदार गोलंदाजी करत सात विकेट्स चटकावल्या. फक्त देशच नाही तर अख्खे जग शामीच्या गोलंदाजीवर फिदा झाले, अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही शामीच्या गोलंदाजीची भुरळ पडली आहे.
शामीच्या गोलंदाजीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अगदी भरभरून कौतुक केले आहे.
टीम इंडियाच्या सेमीफायनलमधील धमाकेदार विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ट्वीट केले आहे. त्या ट्वीटमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, ‘आजची सेमीफायनल अधिक खास बनली ती शानदार वैयक्तिक कामगिरीमुळे, मोहम्मद शामीची तुफान गोलंदाजी क्रिकेटप्रेमींच्या भावी पिढ्यांच्या स्मरणात राहील. वेल प्लेड शामी!’
पंतप्रधान मोदींशिवाय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक नेत्यांनी भारताच्या विजयाचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, यंदाच्या विश्वचषकात शामीने सहा सामन्यांत २३ विकेट्स चटकावल्या आहेत. न्यूझिलंडविरुद्धच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
मोहम्मद शामी टीम इंडियासाठी ठरला ‘हुकमी सत्ता’
न्यूझिलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करत ३९७ धावांची मोठी धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझिलंडचा संघ ३२७ धावांवर गडगडला. भारतीय क्रिकेट संघाचा विश्वचषक २०२३ मधील हा सलग दहावा विजय. भारताकडून मोहम्मद शामीने ९.५ षटकांत ५७ धावांत ७ विकेट्स घेतल्या. पंतप्रधान मोदींशिवाय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक नेत्यांनी भारताच्या विजयाचे अभिनंदन केले.
शामीच्या वेगासमोर किवींची दांडी गुल
दुसरीकडे, ३९८ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना न्यूझिलंडचा संघ केवळ ३२७ धावाच करू शकला आणि सामना ७० धावांनी गमावला. किवी संघाकडून डॅरेल मिशेलने १३४ धावांची खेळी केली. तर कर्णधार केन विल्यम्सनने ६९ आणि ग्लेन फिलिप्सने ४१ धावा केल्या. भारतीय संघाकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने सर्वाधिक ७ विकेट्स चटकावल्या. याव्यतिरिक्त जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
टीम इंडियाच्या नावे अनेक रेकॉर्डस्
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल (८०) यांनी ८.२ षटकांत ७१ धावा जोडून शानदार सुरुवात केली. गिलही चांगलाच फॉर्मात दिसला, पण तो ७९ धावांवर रिटायर्डहर्ट झाला. अखेरच्या षटकांमध्ये गिल पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात आला तरी त्याला शतक झळकावता आले नाही. या सामन्यात विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील ५०वे शतक झळकावले. विराट एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा खेळाडू बनला आणि सचिन तेंडुलकरचा (४९ शतके) विक्रम मोडला. श्रेयस अय्यरनेही झंझावाती शतक झळकावले. या सर्व विक्रमांच्या जोरावर टीम इंडियाने विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला.