नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २२-२३ ऑक्टोबर रोजी रशिया दौ-यावर जाणार आहेत. या दौ-यात पंतप्रधान मोदी, रशियाच्या अध्यक्षतेखाली कझान येथे होणा-या १६ व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होतील. समान जागतिक विकास आणि सुरक्षिततेसाठी बहुपक्षीयता मजबूत करणे या थीमवर यंदाची ब्रिक्स शिखर परिषद आयोजित केली आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या परिषदेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे नेते एकत्र येणार आहेत. सुरू केलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी आणि भविष्यातील सहकार्यासाठी संभाव्य क्षेत्रे ओळखण्याची ही शिखर परिषद मोलाची संधी देईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. आपल्या दौ-यात पंतप्रधान मोदी रशियामध्ये ब्रिक्स सदस्य देशांच्या प्रमुखांसोबत द्विपक्षीय बैठका घेऊ शकतात.
ब्रिक्स सदस्य देश
रशिया यंदा ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवत आहे. ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. सौदी अरेबिया, इराण, इथियोपिया, इजिप्त, अर्जेंटिना आणि संयुक्त अरब अमिराती हे त्याचे नवीन सदस्य आहेत.
जुलैमध्ये पंतप्रधान मोदी रशियाला गेले होते
यापूर्वी ८ जुलै रोजी पंतप्रधान मोदी दोन दिवसांसाठी रशियाला गेले होते. येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ सेंट अँर्ड्यू द अपॉस्टल देऊन सन्मानित केले. यावर पीएम मोदींनी पुतीन यांचे आभार मानले. हा १४० कोटी भारतीयांचा सन्मान असल्याचे ते म्हणाले होते.