18.8 C
Latur
Tuesday, December 24, 2024
Homeराष्ट्रीयमराठा, धनगर आरक्षणासाठी पंतप्रधान सकारात्मक

मराठा, धनगर आरक्षणासाठी पंतप्रधान सकारात्मक

खासदार निंबाळकर, उदयनराजेंनी घेतली मोदींची दिल्लीत भेट

नवी दिल्ली : मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षण मागण्यासंदर्भात माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवल्याची माहिती निंबाळकर यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती उदयनराजे भोसले व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आज भेट घेतली. यावेळी आरक्षणाच्या प्रश्­नावर सकारात्मक चर्चा झाली. सोमवारी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय खासदारांची बैठक झाली. त्याच पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटीची वेळ मागितली होती.

भेटीदरम्यान खासदार छत्रपती उदयनराजे व खासदार नाईक-निंबाळकर यांनी महाराष्ट्रातील मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षण मागणीवर त्यांच्याशी चर्चा केली. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही भूमिका स्पष्ट केली.

आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी हा समाज अनेक वर्षे झटत आहे. इतर राज्यामध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळाले आहे. परंतु महाराष्ट्रात शब्दांचा खेळ झाला आहे. महाराष्ट्रात धनगड शब्द नसल्याने आरक्षण मिळत नाही, तरी याबाबत लक्ष घालावे, अशी विनंती केली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक विचार केला जाईल व लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिल्याचे खासदार नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR