नवी दिल्ली : मणिपूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरूच आहे. मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यात सोमवारी दोन गटांमध्ये झालेल्या चकमकीत १३ जण ठार झाले आहेत. मणिपूर हिंसाचारावर काँग्रेसने केंद्राला घेरले आहे. मणिपूरमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त करत काँग्रेसने मंगळवारी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले ‘मौन’ तोडून चर्चा सुरू करावी जेणेकरून सर्व पक्षांना मान्य असलेल्या या ईशान्येकडील राज्यात तोडगा काढता येईल. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने अद्याप थेट पावले का उचलली नाहीत, असा सवाल पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
खर्गे यांनी म्हटले की, मणिपूरमध्ये सात महिन्यांपासून सुरू असलेला हिंसाचार अक्षम्य आहे. कथित गोळीबारात आणखी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २१५ दिवसांत ६० हजाराहून अधिक लोक बेघर झाले आहेत. अंतर्गत विस्थापित लोक मदत छावण्यांमध्ये राहत आहेत जेथे परिस्थिती अमानवी आणि समाधानकारक नाही. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्यास जबाबदार कोण असा सवाल त्यांनी केला. राज्यात सात महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या हिंसाचारामुळे १८० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.