पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार अॅक्शन मोडवर आले आहे. पुणे शहरातील नामचीन गुंडांची ओळख परेड काढण्यात आली आहे. कुख्यात गुंड गजा मारणे, निरेश घायवळसह पुण्यातल्या इतर गुंड टोळ््यांच्या म्होरक्यांची पोलिसांनी ओळख परेड काढले आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच पुण्यातील नामचीन गुंडांना पहिलाच दणका दिला. पुणे पोलिस आयुक्तालयात जवळपास २०० ते ३०० गुन्हेगार यांची परेड करत आयुक्तांकडून सर्वांना तंबी देण्यात आली. पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या इतिहासात सर्व टोळ््यांना समोरासमोर आणून अशा प्रकारे दम भरण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पुणे शहरातील अनेक नामचीन गुंडांची सध्या दहशत दिसत आहे. त्यात पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्यादेखील टोळीयुद्धात करण्यात आली. शहरातील वाढती गुन्हेगारी पाहता नवनियुक्त पोलिस आयुक्त अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी थेट पोलिस आयुक्तालयात साधारण २०० ते ३०० अट्टल गुन्हेगारांची परडे काढली आहे आणि या गुन्हेगारांना चांगलाच दणका दिला आहे. पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी गुन्हेगारी टोळ््यांना अटकाव करण्यासाठी गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारी टोळ््यातील प्रमुख आणि साथीदारांना ओळख परेडसाठी बोलावण्यात आले होते.
यात गजानन मारणे, निलेश घायवळ यासह पुण्यातील इतर गुंडांच्या टोळीतील प्रमुख म्होरख्यासह इतर सदस्यांचा या परेडमध्ये समावेश होता. पुण्यात सध्या अनेक गुंडांच्या टोळ््या आहेत. त्यात महत्वाचे म्हणजे आता पुण्यात रोज एक नवी टोळी तयार होताना दिसत आहे. त्यात कोयता गँग, गाडी फोडून दहशत पसरवणा-या गँगचादेखील समावेश आहे. लहान मोठ्या सगळ््याच टोळ््यांना तंबी देण्यासाठी पोलिस आयुक्तांनी थेट आयुक्तालयातच परेड काढली.
पुण्याचे नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार हे अॅक्शन मोडवर आले आहे. त्यांनी पहिल्याच दिवशी हेल्मेट सक्तीवर नजर ठेवणार असल्याचे सांगितले होते आणि त्यानंतर बैठकीत पुण्यातील सगळ््याच पोलिसांना विविध सूचनादेखील केल्या होत्या. त्यानंतर शहरातील अट्टल आणि गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. शिवाय यापुढे त्यांच्याकडून कोणताही गुन्हा होणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. आपल्या परिसरातील फाईलवरचे गुन्हेगार ओळखून त्यांचा योग्य तो बंदोबस्त करा, असेही ते म्हणाले होते. या सगळ््यानंतर आज त्यांनीच सगळ््या गुन्हेगारांना दणका दिल्याचे पाहायला मिळाले.
पुण्यात गुन्हेगारीला आळा घालणार
अमितेश कुमार हे नागपूरचे आयुक्त होते. त्यावेळी ते नागपूर शहराच्या गुन्हेगारीवर आळा घालण्यात यशस्वी झाले होते. आता ते पुण्यातील गुन्हेगारी नष्ट करण्याच्या किंवा आळा घालण्याच्या तयारीत दिसत आहेत. त्यांनी आल्यावर काही दिवसांत गुन्हेगारांची परेड काढली आहे.
गुन्हेगारी करायची नाही, रिल्स बनवायचे नाहीत
गुन्हेगारी करायची नाही, रिल्स बनवायचे नाहीत. स्टेटसला गुंडगिरीचे व्हिडिओ ठेवायचे नाहीत, अशी तंबी पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली. गुन्हेगार आपले स्वत:चे वर्चस्व दाखवण्यासाठी रिल्स शूट करून सोशल मीडियाच्या अकाउंटवर पोस्ट करत असल्यामुळे समाजात विकृती पसरत आहे. त्यामुळे गुन्हा करण्यापूर्वी विचार करावा, असे झेंडे म्हणाले.