बीड : मराठा आरक्षणाचा बंदोबस्त असल्याने सायबर पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचा-यांचा राखीव बंदोबस्त ठेवला होता. दुपारच्या वेळी सहका-यांसोबत चहा पिला. घरी गेल्यावर छातीत दुखत असल्याने स्वत: बुलेटवर जिल्हा रुग्णालयात आले.
ओळखीच्या डॉक्टरांसोबत बोलत असतानाच अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने ते कोसळले अन् क्षणात मृत्यू झाला. ही घटना बीड शहरात सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
अन्वर अहमद शेख (वय ३६, रा. बीड) यांची सायबर पोलिस ठाण्यात नियुक्ती होती. सोमवारी मराठा आरक्षण आंदोलनाचा बंदोबस्त होता. त्यामुळे सायबर पोलिस ठाण्यातील सर्वच अधिकारी, कर्मचा-यांचा बंदोबस्त राखीव ठेवला होता. तरीही कार्यालयीन काम सुरू होते. असे असतानाच अन्वर यांना त्रास जाणवू लागला. परंतु, अॅसिडिटी असेल म्हणून दुर्लक्ष केले. परंतु घरी गेल्यावर अस्वस्थ वाटत असल्याने व त्रास जाणवू लागल्याने जिल्हा रुग्णालयात आले.
येथे आल्यावर डॉक्टरांनी तपासणी केली. याचवेळी हृदयविकाराचा झटका आल्याने ते जमिनीवर कोसळले. डॉक्टरांनी उपचारासाठी प्रयत्न केले, परंतु काही क्षणांत त्यांची प्राणज्योत मालवली. ही बातमी समजताच पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह बीड पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह मित्र परिवारांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ-बहीण, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.