चंद्रपूर : चिमूर येथील गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह आज (दि. १०) अखेर सापडला. हा मृतदेह नागपूर शहराजवळील हरिश्चंद्रवेळा गावाजवळ निर्जनस्थळी आढळून आला. दरम्यान, या महिलेच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी नरेश डाहूले या चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेतील निलंबित पोलिस कर्मचा-याला अटक केली आहे. अरुणा काकडे (३७) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिकची माहिती अशी की, चिमूर येथील देवांश जनरल स्टोर्सच्या संचालिका अरुणा काकडे या २६ नोव्हेंबर रोजी नागपुरातील इतवारी मार्केटमध्ये दुकानातील सामान खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र अरुणा काकडे घरी न परतल्याने कुटुंबियांनी चिमूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली होती. मिसिंग तक्रार असल्याने नागपूर आणि चंद्रपूर पोलिसांनी संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आरोपीचा छडा लावला आहे. निलंबत पोलिस कर्मचारी नरेश डाहूले याने अरुणा काकडे (३७) या महिलेचा खून केला असल्याचे समोर आले आहे.
लहानपणापासून एकाच शाळेत शिकले होते
मृत्यू झालेली महिला अरुणा काकडे आणि आरोपी नरेश डाहूले लहानपणापासून एकाच शाळेत शिकले होते. दोघे वर्गमित्र होते. २६ तारखेला मृतक अरुणा आणि आरोपी नरेश नागपूरला एकत्र होते. दरम्यान, या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु झाला होता. दोघे नागपूरला गेले असताना दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि आरोपीने अरुणा यांचा गळा दाबून हत्या केली.
नरेश डाहूलेचा अनेक घरफोड्यांमध्ये समावेश
महिलेचा खून केल्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह हरिश्चंद्रवेळा येथील निर्जनस्थळी असलेल्या एका घरातील शौचालयाच्या टाकीमध्ये लवपला होता. त्यानंतर निलंबित पोलिस कर्मचारी असलेला आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी कॉल रेकॉर्डच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेत कर्मचारी असलेल्या नरेश डाहूलेचा चंद्रपूर शहरातील अनेक घरफोड्यांमध्ये समावेश आढळला होता. याच आरोपावरून त्याला मागील वर्षी अटक करून पोलिस दलातून निलंबित करण्यात आले होते.