मुंबई : प्रतिनिधी
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूहल्ला झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. एकीकडे सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. तर, दुसरीकडे विरोधकांनी या घटनेनंतर सत्ताधा-यांवर निशाणा साधला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे गृहराज्यमंत्री (शहर) योगेश कदम यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, पोलिसांचा तपास चालू आहे. चोरी करून सैफ अली खानवर हल्ला करणारी व्यक्ती ही नोकरांपैकीच होती का? की बाहेरची होती? याबाबत सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यामुळे याबाबत तर्कवितर्क लावण्यात काही अर्थ नाही.
काही वेळातच याबाबत नेमकी माहिती सर्वांसमोर येईल,’’ असे म्हणाले. यानंतर विरोधकांकडून होणा-या टीकेवर ते म्हणाले की, विरोधकांना अशा घटनांवर बोलण्याचा काही अधिकार नाही. त्यांच्या कारकीर्दीमध्ये काही व्यक्तींची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी आमच्यावर आरोप करू नयेत. चोरीच्या उद्देशाने कोणी आले असेल, आणि त्याने सैफ अली खानवर हल्ला केला असेल. पण या घटनेवरून पोलिसांना बदनाम करणे चुकीचे आहे. असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
पुढे मंत्री योगेश कदम म्हणाले की, विरोधक आहेत म्हणून कोणत्याही घटनेवर विरोध करू नये. आजच्या घडीला मुंबई पोलिस हे संपूर्ण देशात अव्वल आहेत. त्यामुळे मुंबई पोलिस तसेच सर्व पोलिस प्रशासनाला बदनाम करू नये, असे आवाहन विरोधकांना केले आहे.