बीड : पोलिस ठाण्याचा प्रभारी अधिकारी होण्यासाठी अनेक सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक हे राजकीय नेते, मंत्री, आमदार, खासदारांसह इतर लोकांच्या माध्यमातून ‘फिल्डिंग’ लावत असतात. आतापर्यंत याचा ‘फायदा’ही अनेकांना झाला, परंतु आता तसे चालणार नाही. ज्यांच्यात गुणवत्ता आहे, अशांनाच ठाणेदार म्हणून नियुक्ती दिली जाणार आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मे महिन्यात जिल्ह्यातील बहुतांश ठाणेदार बदलणार आहेत. यात ‘फिल्डिंग’ लावून बसलेल्यांनाही ‘कंट्रोल’ केले जाणार आहे.
जिल्ह्यात सायबरसह २९ पोलिस ठाणे आहेत. परंतु, मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्था आणि राजकीय नेत्यांकडून होत असलेले आरोप पाहता १०७ अधिका-यांनी बीडच्या बाहेर बदली करण्यासाठी विनंती केली आहे. यात पोलिस उपनिरीक्षक ते उपअधीक्षक यांच्यापर्यंतच्या अधिका-यांचा समावेश आहे, परंतु यातीलच अनेकांनी या अगोदर ‘फिल्डिंग’ लावून पोलिस ठाणे घेतले होते. काही जण तर मंत्रालयात ‘फिल्डिंग’ लावून आणि ‘टेंडर’ भरून खास बीडमध्ये आले होते, परंतु पोलिस अधीक्षक म्हणून नवनीत काँवत यांनी पदभार घेतला आणि अनेकांच्या पायाखालची वाळूच सरकली. जे ठाणे हवे म्हणणारेही आता आम्हाला नियंत्रण कक्षात द्या किंवा बदली करा, अशी विनवणी करू लागले आहेत. परंतु, आपण कोणाच्याही बदलीची शिफारस करणार नाही. आहे त्याच अधिकारी, कर्मचा-यांवरच जिल्ह्यात शांतता ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास नवनीत यांनी व्यक्त केला आहे.
१५ ठाणे होणार रिकामे
१०७ अधिका-यांनी विनंती बदल्यांसाठी अर्ज केला आहे. यामध्ये २९ पैकी १५ ठाणेदार आहेत. तसेच, विशेष शाखांचेही प्रभारी अधिकारी आहेत. आता याच ठिकाणी गुणवत्ता असलेल्या अधिका-यांना नियुक्ती दिली जाणार आहे. पहिल्यांदाच प्रामाणिक अधिका-यांना ‘फुकटात’ ठाणेदार होता येणार असे चित्र पाहायला मिळत आहे.
एलसीबीत कोण बसणार?
पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांचीही परळीहून स्थानिक गुन्हे शाखेत बदली झाली. त्यानंतर आ. सुरेश धस यांनी त्यांच्यावर आरोप केले. शेख यांनीही बदलीसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या जागेवर कोण येणार? याकडे लक्ष लागले आहे. येथे येण्यासाठी अनेक अधिकारी हे थेट मंत्रालयातून ‘फिल्डिंग’ लावत असतात. परंतु, आता येथे जर मेरिट आणि ज्येष्ठतेचा नियम लागू केला, तर दोन ते तीनच अधिकारी पात्र ठरतात. त्यामुळे या पदाकडेही लक्ष लागले आहे.
सोनवणे, धस यांच्यावर आरोप
जिल्ह्यातील २९ पैकी एका ठाणेदाराने आपल्या विनंती अर्जामधून थेट खा. बजरंग सोनवणे आणि आ. सुरेश धस यांच्यावर आरोप केले आहेत. मतांचे राजकारण साधण्यासाठी काही पण आरोप करत असल्याची टीका त्यांनी यातून केली आहे. तसेच, बीडच नव्हे, तर मराठवाड्याच्या बाहेर आपली बदली करावी, अशी विनंती त्यांनी पोलिस अधीक्षकांमार्फत महासंचालकांना पाठविलेल्या अर्जातून केली आहे. आरोप करणारे ठाणेदार कोण? याची पोलिस दलात सध्या चर्चा सुरू आहे.
मेरिट पाहूनच नियुक्ती : काँवत
विनंती बदलीसाठी अनेकांनी अर्ज केले आहेत, परंतु त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. तर, ठाणेदार बदलण्याची प्रक्रिया ही मे महिन्यात राबविली जाईल. नियुक्ती देताना नाव, चेहरा किंवा शिफारस यांचा विचार केला जाणार नाही. मेरिट पाहूनच त्यांना नियुक्ती दिली जाईल. जर कोणी ‘फिल्डिंग’ लावली, तर त्यांचा अहवाल तयार केला जाईल असे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी म्हटले आहे.