28.4 C
Latur
Friday, May 16, 2025
Homeमहाराष्ट्रनागरिकांना ५० लाखांचा चुना लावणा-या गुत्तेदारास पोलिस कोठडी

नागरिकांना ५० लाखांचा चुना लावणा-या गुत्तेदारास पोलिस कोठडी

मानवत : तालुक्यातील मंगरूळ पालमपट व आटोळा, सोमठाणा, नरळद या ठिकाणच्या ७ ते ८ जणांकडून बांधकामासाठी अ‍ॅडव्हान्स रक्कम घेवून बांधकाम अर्धवट ठेवून गुत्तेदाराने पळ काढला होता. या प्रकरणी विठ्ठल निलवर्ण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अमजद खान इब्राहीम खान रा. धाररोड परभणी याच्या विरूध्द गुन्हा नोंद झाला आहे.

आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. मानवत तालुक्यातील मंगरूळ पा.प येथील रहिवाशी विठ्ठल अंकुशराव निलवर्ण यांनी आपल्या घराचे बांधकाम काढले होते. त्यांनी ओळखीचे व्यंकट श्रीधरराव कुलकर्णी राहणार नरळद यांना बांधकाम बाबत चौकशी केली असता त्यांनी त्यांचे बांधकाम करत असलेले गुत्तेदार अमजद खान इब्राहिम खान रा. धार रोड परभणी यांना विठ्ठल नीलवर्ण यांच्या राहत्या घरी घेऊन आले. यावेळी बांधकामाची चौकशी करून १३०० रुपये प्रति चौ. फुटाप्रमाणे बांधकाम देण्यात आले.

२९ नोव्हेंबर २०२४ रोजी मानवत येथील नोटरी धारक वकिलाकडून बांधकामाचा करारनामा करून घेत गुत्तेदाराला बांधकामासाठी ३ लाख रुपये दिले. घराच्या पायाभरणीनंतर २ लाख रुपये देण्यात आले. त्यानंतर गुत्तेदारास वारंवार मजूर पाठवून काम पूर्ण करण्याबाबत तगादा लावला. परंतू मजूर पाठवतो असे म्हणून गुत्तेदार वेळ काढून नेत होता. निलवर्ण यांचा भाऊ ऋषिकेश एकनाथ निलवर्ण याने सुद्धा त्यांच्या घराचे बांधकाम गुत्तेदार अमजद खान यास दिले होते.

तसेच एकूण ७ लाख रुपये बांधकाम करिता दिले होते. त्यांचे सुद्धा बांधकाम अर्धवट सोडून सदर गुत्तेदार पळून गेल्याचे समजले. या गुत्तेदाराबद्दल माहिती काढल्यावर त्याने तालुक्यातील आटोळा, सोमठाणा व नरळद येथील साधारणत: सात ते आठ जणांचे पैसे घेऊन बांधकाम न करता पळून गेल्याचे समजले. या प्रकरणी विठ्ठल नीलवर्ण यांचे फियार्दीवरून मानवत पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास मानवत पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील हे करत आहेत.

या गावातील लोकांना लावला चुना
गुत्तेदाराने विठ्ठल सखाराम करडले रा. आटोळा यांच्याकडून १ लाख ६५ हजार रुपये, सिताराम विठोबा करडले रा. आटोळा ७ लाख रुपये, दत्ता सखाराम करडले रा. आटोळा ४ लाख ५० हजार रुपये, पार्वतीबाई उद्धवराव बारहाते रा. नरळद ४ लाख ५० हजार रुपये, पांडुरंग यादवराव निर्वळ रा.नरळद ७ लाख २५ हजार रुपये, व्यंकटराव श्रीधरराव कुलकर्णी रा. नरळद ५ लाख २५ हजार रुपये, संतोष माणिकराव मुळे रा. सोमठाणा २ लाख ५० हजार रुपये, रामकिशन मुंजाजी निर्वळ रा. सोमठाणा ७ लाख रुपये व श्रीकिशन आबासाहेब निर्वळ रा. सोमठाणा २ लाख ९० हजार रुपये या लोकांचे एकूण ४२ लाख ५५ हजार रुपये एवढी रक्कम घेऊन बांधकाम अर्धवट ठेवून पळ काढला आहे.

नागरिकांनी बांधकाम देताना सतर्कता बाळगावी : पो.नि.संदीप बोरकर
या घटनेच्या अनुषंगाने मानवतचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, तालुक्यातील नागरिकांनी बांधकाम देताना बांधकाम गुत्तेदार व मजूर यांची ओळख पटवूनच बांधकाम द्यावे. एवढेच नव्हे तर शासनाने सध्या प्रत्येक कामगाराला शासनाकडून ओळखपत्र दिले आहे. शासकीय ओळखपत्र दाखवल्याशिवाय बांधकाम देऊ नये. बांधकाम करते वेळेस कामगार व गुत्तेदार हे सरळ घरात वावरतात अशा वेळी कोणताही गैर प्रकार होऊ नये या साठी सतर्कता बाळगावी व अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे त्यांनी सांगितले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR