25.4 C
Latur
Monday, March 3, 2025
Homeपरभणीमंत्रालयाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या भीमसैनिकांना पोलिसांनी अडवले

मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या भीमसैनिकांना पोलिसांनी अडवले

आंदोलक आणि पोलिसांत संघर्ष काँग्रेसच्या खासदार, आमदारांची उपस्थिती

परभणी : सोमनाथ सूर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडे यांना न्याय मिळावा यासाठी सोमवार दि. ३ मार्च मार्च रोजी मुंबई येथे आंबेडकरी संघटना, सर्व पक्ष व संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनात महाराष्ट्रातील भीमसैनिकांनी सहभाग घेतला. यावेळी मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या हजारो भीमसैनिकांना पोलिसांनी काही तास अडवले.

त्यामुळे बराच वेळ आंदोलक आणि पोलिसांत संघर्ष झाला. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांना बोलवून घेत मागण्या मान्य करण्याबाबत त्या विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांची बैठक लावून मागण्या मान्य केल्या जातील हे आश्वासन दिले तेंव्हा हे आंदोलन मागे घेण्यात आले.

सकाळपासूनच मुंबईच्या आझाद मैदानावर निळे ध्वज, पंचशील ध्वज घेऊन तसेच हातामध्ये फलक घेऊन जोरदार घोषणा देत भीमसैनिक आझाद मैदानात दाखल झाले. यावेळी या आंदोलनाचे समन्वयक डॉ. सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांच्यासह मंचावर भिक्खू संघ यांची उपस्थिती होती. या आंदोलनाला मुंबई काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार, परभणीचे आ. डॉ. राहुल पाटील, आ. सिद्धार्थ खरात मेहकर, पीआरपीचे राज्य सचिव गौतम मुंडे आदिंची विशेष उपस्थिती होती.

आंदोलक विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूस जबाबदार असणा-या पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे असे जोरदार मागणी करण्यात आली. तसेच सूर्यवंशी व वाकोडे परिवार यांना १ कोटीची मदत करून त्यांचे पुनर्वसन करावे. कोंबींग ऑपरेशन करून निरपराध भीमसैनिकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली. दुपारी ३ वाजता मान्यवरांच्या भाषणानंतर हजारो भीमसैनिकांनी मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी मोर्चा नेला असता आझाद मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच हा मोर्चा पोलिसांकडून अडवण्यात आला. यावेळी पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये बराच वेळ संघर्ष पाहायला मिळाला.

सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे व पोलिसांवर कारवाई केलीच पाहिजे. सरकारचा जाहीर निषेध अशा घोषणाही आंदोलन कर्त्याच्या वतीने करण्यात येत होत्या. हा संघर्ष सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांच्या एका शिष्टमंडळाला मंत्रालयात बोलवून घेत मागण्यांचे निवेदन स्वीकारले तसेच काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. उर्वरीत मागण्या मान्य करण्याबाबत त्या विभागांच्या वरिष्ठ अधिका-यांची बैठक बोलावून या मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन दिल्या नंतरच हे आंदोलन थांबवण्यात आले. या राज्यव्यापी आंदोलनास परभणीसह राज्यातून आंबेडकरी संघटना संविधान प्रेमी नागरिक यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR