पाटणा : संपूर्ण देशभरात होळीचा सण साजरा केला जात असतानाच बिहारमधून असा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेज प्रताप यादव यांनी वर्दीत एका पोलिस शिपायाला नाचायला भाग पाडले आहे. धक्कादायक बाब म्हणजे नाचला नाही तर तुला निलंबित करून अशी धमकीच तेज प्रताप यांनी या शिपायाला दिल्याचे व्हीडीओमध्ये दिसत आहे.
दरम्यान तेज प्रताप यांच्या सांगण्यावरून नाचल्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर बिहार पोलिसांनी त्या शिपायावरच कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव दीपक कुमार असे आहे. त्याला आता आमदार तेज प्रताप यादव यांच्या अंगरक्षक पदावरून हटवण्यात आले आहे. होळीच्या दिवशीचा बिहारमधील एक व्हीडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आमदार तेज प्रताप यादव एका पोलिस शिपायाला म्हणतात आता मी एक गाणे वाजवणार आहे. त्यावर तुला नाचावे लागेल. नाचला नाहीस तर तुला निलंबित करेन. अशी धमकी दिल्यानंतर तो पोलिस शिपाई पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर नाचताना दिसत आहे.
या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच बिहारसह देशातील राजकारण तापले आहे. अनेकांना यावरून तेज प्रताप यादव यांच्यावर टीका केली आहे. जनता दल (यु) पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांनी, अशा कृत्यांना बिहारमध्ये थारा देऊ नये.
राज्यातील जंगलराज संपला आहे. पण लालू यादव यांचे युवराज पोलिसाला नाचण्यासाठी धमकी देत आहेत. मात्र, लालू यादव यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य असू द्या त्यांनी आता बिहार बदलला आहे हे लक्षात ठेवावे. तर भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी देखील बाप तसा बेटा म्हणत लालू यादव यांच्या कार्यकाळावर टिका केली आहे.