चंदिगड : खलिस्तानी अमृतपाल सिंह आता पंजाबच्या राजकारणात प्रवेश करणार आहेत. सिंह नवीन पक्ष स्थापन करण्याची तयारी करत आहेत. यामुळे आता पंजाबमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. १४ जानेवारीला या नव्या पक्षाची घोषणा होऊ शकते. मुक्तसर साहिब येथे होणा-या माघी मेळ्यात अमृतपाल सिंह आपल्या नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा करणार आहेत.
लोहरीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणा-या या मेराला पंजाबमध्ये खूप महत्त्व आहे. याशिवाय अमृतपाल सिंह यांचे वडील आणि त्यांच्या समर्थकांनी पंथ बचाओ, पंजाब बचाओ रॅलीही काढली जाणार आहे. या रॅलीतच अमृतपाल सिंह यांच्या कुटुंबीय आणि समर्थकांकडून पक्ष स्थापनेची घोषणा केली जाणार आहे. अमृतपाल सिंह सध्या आसामच्या दिब्रुगड तुरुंगात बंद आहेत. अमृतपाल सिंह २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत खदूर साहिब लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. ते तुरुंगात होते, पण त्यांच्या कुटुंबीयांनी प्रचार केला होता आणि ते येथे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते.
अमृतपाल सिंह यांच्या वतीने राजकीय पक्ष स्थापन केल्याची पुष्टी त्यांचे वडील तरसेम सिंह यांचे सहकारी सुखविंदर सिंह आगवान यांनी दिली आहे. सुखविंदर सिंह आगवान हे देखील कट्टरतावादी विचारसरणीचे आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येत सहभागी असलेला सतवंत सिंह यांचे ते पुतणे आहेत. सुखविंदर सिंह यांचे अमृतपाल सिंह आणि त्यांच्या कुटुंबाशी खूप जवळचे संबंध आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार तरसेम सिंह, त्यांचे कुटुंबीय आणि अमृतपाल सिंह यांच्या समर्थकांच्या उपस्थितीत पक्ष स्थापनेची घोषणा केली जाणार आहे.
तरसेम सिंह यांनी ऑक्टोबर २०२४ मध्येच पक्ष स्थापन करण्याचा इरादा व्यक्त केला होता. आम्ही पंजाबमध्ये फिरू आणि लोकांशी बसून बैठका घेऊ, असे ते म्हणाले होते. त्यानंतरच पक्ष कसा बनवायचा आणि कोणत्या लोकांना सोबत घ्यायचे याचा निर्णय होणार आहे. संप्रदायाच्या रक्षणासाठी जीवन अर्पण करण्यास तयार असलेल्या अशा लोकांना आम्ही प्राधान्य देऊ, असे ते म्हणाले.