पुणे : वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये सासरा राजेंद्र आणि दीर सुशील यांना अटक झाली आहे. यावर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला आहे. हे आरोपी जर स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाले असतील तर आरोपींना राजकीय पाठबळ असल्याचे अंधारे म्हणाल्या.
या संदर्भात सुषमा अंधारे म्हणाल्या की, वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये पहाटे साडेचार वाजता दीर आणि सासरा यांना अटक झाली आहे. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले की ते स्वत:हून हजर झाले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपी स्वत:हून हजर झाले असतील तर आरोपींना राजकीय पाठबळ आहे ही गोष्ट अधिकच अधोरेखित होते. ज्यावेळी वैष्णवी हगवणे यांच्या सार्सयाला आणि दीराला अटक झाली, त्यावेळी ते हॉटेलमध्ये जेवण करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात अधिकच धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुषमा अंधारे यांनी यासंदर्भात महिला आयोगावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये आले असे जर सहा दिवसापासून रुसून बसलेला महिला आयोग सांगत असेल तर वैष्णवीचा जीव गेल्यापासून पाच दिवस होऊन गेल्यानंतरही सरकार अॅक्शन मोडमध्ये का आले नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वैष्णवी प्रकरणात आरोपींना अटक होत असतानाच नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यामध्ये भक्ती अथर्व गुजराती या तरुणीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. आता या प्रकरणात सुस्तावलेला आयोग अॅक्शन मध्ये कधी येणार? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.