15.6 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रगणेशोत्सवाच्या मांडवात राजकारण जोमात

गणेशोत्सवाच्या मांडवात राजकारण जोमात

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंडळांचं चांगभलं

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राजकीय वातावरण तयार होत आहे. आता सण-उत्सवांचे दिवस सुरू झाले आहेत. सार्वजनिक उत्सवांपैकी एक असलेला दहीहंडी उत्सव आणि तोंडावर असलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे यंदा हा उत्सव साजरा करण्यात राजकीय पक्षांत स्पर्धा लागली होती. त्यानंतर, आता श्रीगणेशोत्सवाच्या मांडवात राजकारण जोमात असल्याचे दिसू लागले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा उत्सव आल्यामुळे मंडळांचे चांगभले झाल्याचे दिसते आहे.

गणेशोत्सवाच्या आडून आगामी राजकारणाचे मनसुबे रचले जात आहेत. भाजप, उद्धवसेना, शिंदेसेनेत गणेशोत्सवाची स्पर्धा लागल्याचे दिसून आले. शहरातील तिन्ही मतदारसंघांत लहान-मोठ्या गणेश मंडळांना विद्यमान आणि इच्छुक विधानसभा उमेदवारांनी हातभार लावल्याची चर्चा आहे. ढोलपथक, टी शर्ट बनवून देण्यासह, महाप्रसाद, मिरवणुकीसाठी डीजे, तरुण-अबाल-वृद्धांच्या आकर्षणासाठी विशेष कार्यक्रमांसाठी राजकीय पक्ष, नेते हातभार लावत आहेत. शहरात सायंकाळच्या सुमारास मानाच्या व गर्दीच्या श्रीगणेशाच्या आरतीला जाण्यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधी आणि इच्छुकांमध्ये स्पर्धा लागली आहे.

शिंदेसेनाही आघाडीवर
शिंदेसेनेनेही शहरी मतदारसंघात गणेश मंडळं प्रायोजित केली आहेत. मध्य आणि पश्चिम, फुलंब्री मतदारसंघात शिंदेसेनाप्रणीत गणेश मंडळाची चलती आहे. ढोलपथक, झांजपथक, मिरवणुकांसाठी शिंदेसेनेने तयारी केली आहे.

भाजपची १२० मंडळे
भाजपचे ९ मंडळांत ३८ प्रभागांमध्ये संघटन असून, एका प्रभागात तीन गणेश मंडळे भाजपप्रणीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. यातून सुमारे १२० मंडळे भाजपची आहेत. प्रत्येक प्रमुख चौकात भाजपप्रणीत गणेश मंडळ आहे. लाडकी बहीण योजना, शासनाच्या योजनांचा प्रसार गणेशोत्सवाच्या माध्यमातून करावा, अशा सूचना सर्व मंडळांना देण्यात आल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले आहे.

उद्धवसेनेची १०० मंडळे
उद्धवसेनेची १०० गणेश मंडळे शहरात आहेत, असा दावा करण्यात येत आहे. प्रत्येक चौकात मंडळ स्थापन केले असून, यंदाच्या उत्सवात सामाजिक उपक्रम राबविण्याचे लक्ष्य आहे. प्रत्येक चौकात पक्ष पदाधिका-यांचे मंडळ आहे. वॉर्डनिहाय असलेल्या मंडळांनाही स्थानिक पदाधिका-यांना विधानसभा निवडणुका समोर ठेवून कामाला लावण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR