नवी दिल्ली : दिल्लीत प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली असून एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) वाढल्यानंतर दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याअगोदर सरकारने दिल्लीत ट्रकच्या प्रवेशावर बंदी घातली असून अनावश्यक बांधकामे बंद करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर ९ ते १८ नोव्हेंबरपर्यंत सर्व शाळा बंद राहणार आहेत. सरकारने हिवाळी सुट्टी अगोदरच जाहीर केली आहे. दिल्लीच्या शिक्षण विभागाने डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी सुट्ट्यांची तारीख बदलली आहे.
राजधानी दिल्ली सतत वायू प्रदूषणाच्या विळख्यात आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) मते राजधानी विषारी धुक्याने प्रभावित झाली असून हवेची गुणवत्ता बुधवारीही ‘गंभीर’ श्रेणीत आहे. सीपीसीबीच्या आकडेवारीनुसार, आनंद विहारमध्ये एक्यूआय ४५२ नोंदवला गेला, तर आरके पुरम, पंजाबी बाग, श्री अरबिंदो मार्ग आणि शादीपूरमध्ये एक्यूआय ४३३, ४६०, ३८२ आणि ४१३ होता.
मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने ‘ही लोकांच्या आरोग्याची हत्या आहे’ असे म्हटले आहे. आरोग्य तज्ञ लोकांसाठी, विशेषत: लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांसाठी राजधानीची हवा ‘धोकादायक’ असल्याचे सांगत आहेत. तसेच राजधानीमध्ये ट्रक्सच्या एन्ट्रीवर बंदी घालण्यात आली आहे. यात केवळ अत्यावश्यक सेवा आणि सीएनजी आणि इलेक्ट्रिक ट्रक यांना वगळण्यात आले आहे. दिल्लीत हलक्या आणि मध्यम स्वरुपाचे मालवाहू डिझेल ट्रकही चालवता येणार नाहीत. केवळ अशाच ट्रक्सना परवानगी आहे, जे अत्यावश्यक सेवेतील आहेत.