24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रमांजरा धरण कधीही भरण्याची शक्यता

मांजरा धरण कधीही भरण्याची शक्यता

मांजरा नदीकाठच्या बीड, लातूर, धाराशिव, बीदर जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा

केज : प्रतिनिधी
तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा जलाशयात मंगळवारी सायंकाळी सहा वाजता घेतलेल्या नोंदीनुसार जिवंत पाणीसाठा ७६.५० टक्के एवढा झाला आहे. त्यामुळे हे धरण कधीही भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही माहिती लातूर येथील पाटबंधारे विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता अ. न. पाटील यांनी बीड, लातूर, धाराशिवसह कर्नाटकातील बीदर येथील जिल्हाधिका-यांना कळविली आहे. मांजरा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा द्यावा, असेही जिल्हाधिका-यांना सांगितले आहे.

मंगळवारी सायंकाळी सहाच्या नोंदीनुसार मांजरा धरणाची पाणी पातळी ६४१.३५ मीटर असून, धरणातील उपयुक्त जिवंत पाणीसाठा ७६.५० टक्के आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अशीच पर्जन्यवृष्टी राहून पाण्याचा ओघ असाच राहिला तर मांजरा धरण कधीही निर्धारित पातळीस भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर धरणात येणारे पाणी मांजरा जलाशयाचे दरवाजे उघडण्यात येऊन नदीपात्रात सोडावे लागणार आहे. त्यामुळे मांजरा धरणाखालील मांजरा नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे संभाव्य जीवित व वित्त हानी होणार नाही, यासाठी मांजरा नदीकाठावरील शेतकरी किंवा नदीकाठी वस्ती करून राहणा-या नागरिकांना सावधानतेचा इशारा आपल्या स्तरावरून द्यावा, असे संबंधित जिल्हाधिका-यांना कळविण्यात आले आहे.

ईमेलद्वारे आदेश निर्गमित…
बीड, लातूर, धाराशिवसह कर्नाटकातील बीदर येथील जिल्हाधिका-यांना हे आदेश ईमेलद्वारे निर्गमित करण्यात आले आहेत. यासंबंधीचे स्वतंत्र पत्र संबंधित जिल्हाधिका-यांना मिळणार नसल्याची माहिती मांजरा जलाशयाच्या पाटबंधारे सिंचन शाखा क्रमांक एकचे शाखाधिकारी सूरज निकम यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR