पलक्कड : केरळमधील पलक्कड जिल्ह्यात आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात हमासच्या वरिष्ठ नेत्यांचे पोस्टर्स लावल्याची घटना समोर आली आहे. व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने राज्यात देशविरोधी कट रचल्याचा आरोप केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, १६ फेब्रुवारी रोजी पलक्कड येथील मुस्लिम संत त्रिथला यांच्या समाधीस्थळावर उरुसाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हजारो लोक होते. त्यानंतर, हत्तींवर हमासचे वरिष्ठ नेते इस्माईल हनिया, याह्या सिनवार आणि हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह यांचे पोस्टर्स दिसले. भाजप अध्यक्ष के. सुरेंद्रन म्हणाले, सध्याच्या सीपीआय(एम) सरकारच्या पाठिंब्याने हे सर्व उपक्रम व्होट बँकेच्या राजकारणासाठी केले जात आहेत. देशविरोधी संघटना आणि कट्टरपंथी घटक येथे काम करत आहेत. केरळमध्ये फक्त भाजपच देशविरोधी आणि दहशतवादी कारवायांविरुद्ध आहे.
भाजपचा कट रचल्याचा आरोप
भाजप नेत्याने या कार्यक्रमाचा व्हीडीओ पोस्ट केला आणि म्हटले एक वर्षापूर्वी जेव्हा भाजपने केरळमध्ये झालेल्या एका रॅलीविरुद्ध इशारा दिला होता ज्यामध्ये हमासचा नेता व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी झाला होता, तेव्हा एलडीएफ सरकारने कोणतीही कारवाई केली नाही.
दहशतवाद्यांचा गौरव केला
आता पलक्कडमधील उरूस उत्सवात हजारो लोकांना मारणा-या दहशतवाद्यांचा गौरव करण्यात आला. इस्माईल हानिया आणि याह्या सिनवार यांचे फोटो हत्तींवर बसून काढण्यात आले, जिथे एक कम्युनिस्ट मंत्री आणि एक माजी काँग्रेस आमदार देखील उपस्थित होते.