पंढरपूर : राज्यातील सर्वांत मोठे बसस्थानक म्हणून पंढरपूर येथील नवीन बसस्थानकाचा नावलौकिक आहे. मात्र, याच बसस्थानकातील अस्वच्छता, घाण, घाण पाण्याचे साम्राज्य, चो-या मा-या होत आहेत. घाण पाण्याची दुर्गंधी येत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दररोज श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी बसने ये-जा करणा-या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या प्रवाशांना बसस्थानकाच्या मुख्य गेटसमोर आले की, उखडलेले पेव्हर ब्लॉक, खड्डे, अस्ताव्यस्त लावलेल्या दुचाकी, गटारीचे पाण्याचा प्रवाशांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथून ये-जा करणा-या भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरीत श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक ये-जा करतात, तर ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवास तर महिलांना ५० टक्के सवलत योजना यामुळे बसगाड्या प्रवाशांनी फुल्ल होत आहेत. यामुळे बसस्थानकात सातत्याने गर्दी दिसून येते. प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे तोट्यात चाललेले एसटी महामंडळ फायद्यात येऊ लागले आहे असे असताना महामंडळाने बसस्थानकातील प्रवाशांना मुलभूत गरजांची पूर्तता करणे गरजेचे आहे. यामध्ये मुख्यत्वे बसस्थानकात स्वच्छता असणे प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.
मात्र, याकडेच दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे बसस्थानकात ठिकठिकाणी तसेच पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी तंबाखू, गुटखा, मावा खावून पिचका-या मारल्याचे दिसून येते. तर मुख्य प्रवेशद्वार व इतर दोन प्रवेशद्वारातच घाण साचलेली दिसून येते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुख्य प्रवेशद्वारात प्रवाशांची जास्त वर्दळ असते. या ठिकाणीच गटार तुंबली असून घाण पाणी बाहेर पडत आहे. येथील आगार प्रमुखांनी जबाबदारी घेऊन या घाण पाण्याचा बंदोबस्त करून प्रवाशांची या घाण पाण्यापासून सुटका करावी, अशी मागणी प्रवाशीवर्गातून होत आहे.
बस स्थानकात मुख्य प्रवेशाद्वारातून प्रवेश करताना खड्डे, अस्वच्छता यांचा सामना करावा लागत आहे. तसेच बस स्थानकात भुरट्या चो-या मोठ्या प्रमाणात होत आहेत. याकडेही आगार प्रमुखांनी लक्ष देऊन प्रवाशांना सुरक्षितता द्यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.