22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरवक्फ बोर्ड कायदा दुरुस्तीचा अधिकार केंद्राला : सुशीलकुमार शिंदे

वक्फ बोर्ड कायदा दुरुस्तीचा अधिकार केंद्राला : सुशीलकुमार शिंदे

सोलापूर – वक्फ बोर्डचा कायदा हा संसदेने पारित केला आहे. त्यात दुरुस्ती करण्याचा अधिकार हा संसदेला आहे. त्याबाबत इतरांना बोलण्याचा अधिकार नाही. कोणी काहीही, कसेही बोलत सुटले आहेत. त्यांचे तोंड कोण बंद करणार, असा सवाल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

सोलापुरात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चात आमदार नीतेश राणे आणि तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजासिंह ठाकूर सहभागी झाले होते. त्यात मोर्चानंतर झालेल्या सभेत बोलताना वक्फ बोर्डचा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी दोन्ही आमदारांनी केली होती. विशेषतः टी. राजा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही तसे आवाहन केले. त्यावर बोलताना शिंदे यांनी तो कायदा रद्द करण्याचा अधिकार केवळ संसदेला असल्याचे सांगून बेताल वक्तव्ये करणाऱ्यांना फटकारले.

हिंदू जनआक्रोश मोर्चादरम्यान झालेल्या दगडफेकीवरही सुशीलकुमार शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शांततामय सोलापूरमध्ये अशा घटना घडणे योग्य नाही. सोलापूरच्या शांततेला गालबोट लावणे अयोग्य आहे. हासर्व प्रकार कोणी केला, याबाबत पोलीस तपास करतीलच. पण, धर्म आणि जातीवर कोणी तेढ निर्माण करत असेल तर त्याचा निषेध करतो, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

आमदार टी. राजासिंह यांनी पुण्यातील शरद मोहोळ या गुंडाची भलामण केली होती. त्यावर बोलताना शिंदे म्हणाले की, गुंड प्रवृत्तीच्या माणसाचे समर्थन होता कामा नये. धार्मिक वृत्ती वाढवता वाढवता ती अधार्मिकतेकडे जाण्याची वृत्ती होते आहे का, ती तपासली पाहिजे. त्यामुळे सर्वधर्म समभाव महत्त्वाचा आहे, हे लोकांना कळले पाहिजे. दरम्यान, अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या मंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अशा घटना घडता कामा नये, अशी अपेक्षाही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR