सोलापूर : सोलापूरला असणारे विकसित दळण वळणाची साधने पाहता व्यापार वृद्धीसाठी पोषक वातावरण आहे. टेरी टॉवेल आणि गारमेंट च्या उत्पादित होणाऱ्या जागतिक कीर्तीच्या उत्पादनांसाठी विशेषतः कुशल कारागिरांच्या रोजगारासाठी सोलापूर येथे पंतप्रधान मित्रा मेगा टेक्स्टाईल पार्कची निर्मिती व्हावी अशी मागणी लोकसभा अधिवेशनात खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी केली.
संसदीय लोकसभा अधिवेशनादरम्यान खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी हा प्रश्न उपस्थित केला. सोलापूर शहराची ओळख ही वस्त्रोद्योग निर्मिती करणारे ‘मँचेस्टर सिटी’ म्हणून सुपरिचित आहे. सोलापूर येथे तयार केलेल्या सोलापूरी चादर, शालेय गणवेश आणि टॉवेल हे इतर देशात निर्यात केले जातात. वस्त्रोद्योग व्यवसयासाठी आवश्यक असणारे कुशल कामगार सोलापूर शहरात अनेक वर्षांपासून उपलब्ध आहेत. सोलापूर येथे इतर महानगरांच्या तुलनेत टेक्स्टाईल पार्कसाठी आवश्यक असलेल्या मुलभूत सुविधा सहज उपलब्ध आहेत. विशेषतः चोहोबाजूंनी राष्ट्रीय महामार्ग, वंदे भारत रेल्वे, भविष्यात सुरू होणारी विमानसेवा पाहता सोलापूर येथे टेक्स्टाईल पार्कच्या निर्मिती होणे आवश्यक आहे.
तरी, सोलापूर शहरातील हजारो कुशल कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने सोलापूर येथे पंतप्रधान मित्रा मेगा टेक्स्टाईल पार्कची निर्मिती करण्याबाबत निर्णय घेण्याची मागणी खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी केली.