27.7 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रवंचित घालणार शेतकरी नेते रविकांत तुपकरांना साद

वंचित घालणार शेतकरी नेते रविकांत तुपकरांना साद

अकोला : राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी होण्याची शक्यता आहे. कारण वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे शेतकरी नेते रविकांत तुपकरांना साद घालणार असल्याचे बोलले जात आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर आता नव्याने येणा-या विधानसभा निवडणुकांचे सा-यांना वेध लागले आहे. त्या अनुषंगाने स्थानिक पातळीपासून ते देश पातळीवर राजकीय घडामोडींना आता वेग आले आहे. सध्या जरी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी त्या कधीही आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आता मोर्चे बांधणीसाठी सज्ज झाला आहे. अशातच आता राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी होण्याची शक्यता आहे.

कारण वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे शेतकरी नेते रविकांत तुपकरांना साद घालणार असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर रविकांत तुपकरांना सोबत घेण्याची चाचपणी करत आहेत. रविकांत तुपकरांनी बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली तिस-या आघाडीत जाण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता आहे. परिणामी, दोन्ही नेत्यांमध्ये सध्या जरी प्रत्यक्ष चर्चा झाली नसली तरी प्राथमिक बोलणीला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात नेमके काय होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून तब्बल अडीच लाख मते घेतली होती. तर एकट्या सिंदखेडराजा मतदारसंघात रविकांत तुपकरांना ३० हजार मतांची आघाडी होती. सोबतच बुलढाणा, मेहकर आणि चिखली मतदारसंघात तुपकरांना लक्षणीय मते होती. राजू शेट्टींनी तुपकरांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढल्यानंतर राज्यातील २७ जिल्ह्यात रविकांत तुपकरांचे कार्यकर्ते आणि संघटन सक्रिय झाल्या आहेत. तर दुसरीकडे तुपकरांशिवाय राज्यातील तिसरी आघाडी अपूर्ण असल्याचे मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केले होते. त्यामुळे आंबेडकर तिस-या आघाडीत जाण्याची शक्यता धूसर असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR