चारठाणा : महाराष्ट्राचे कुलदैवत मल्हारी मार्तंड खंडोबा रायाचे पेठ विभागातील मंदिराचे १९५९ साली बांधकाम झालेले होते. ते मंदिर छोटे असल्याने या पुरातन मंदिराचा जिर्णोध्दार करण्यासाठी भक्त व समस्त गावकरी मंडळीनी लोकवर्गणी गोळा करून या खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या नवीन मंदिरात नवीन मुर्ती प्राण प्रतिष्ठा निमित्त खंडोबा रायाची मुर्ती मिरवणूक काढण्यात आली.
दि.१४, दि.१५ या दोन दिवसात मुर्ती प्राण प्रतिष्ठा निमित्त होम हवन, आहुती, पुजा, अर्चना कार्यक्रमास ब्राह्मण सुधाकर मुळे, गुरु गजानन मुळे, गौरव जोशी, श्रेयस मुळे व यजमान सपत्नीक अंकुश हाके, एकनाथ आवचार, संदीप देशमुख, भीमाशंकर भाग्यवंत, बालु क्षिरसागर यांच्या हस्ते विविध धार्मिक कार्यक्रम व विधी पुजा, आहुती करुण घेण्यात आली. दि.१५ रोजी मल्हारी मार्तंड खंडोबा देवाच्या मुर्तीची पुजा प्राण प्रतिष्ठा, अभिषेक व महाआरती नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या मंदिर बांधकामास व सर्व कार्यक्रमास परिसरातील सर्व भाविक भक्त, भजनी मंडळी ,समस्त गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले.
येथील खंडोबा मंदिरात दि.१३ ते दि.१८ पर्यंत देवदिपावलीला घटस्थापना करुन दररोज खंडोबाची महाआरती दि.१७ रोजी येथील परिसरातील सर्व भजनी मंडळाचा सामुहिक भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच दि.१८ रोजी चंपाषष्टी निमित्त सकाळी ८वा अभिषेक व महाआरती नंतर वारु खेळण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. दि.१९ रोजी सकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन खंडोबा मंदिर संस्थान मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.