पुणे : शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका गर्भवती महिलेला जीव गमावावा लागला. पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐनवेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेला. वेळीच उपचार मिळाले असते तर जन्मताच दोन नवजात बाळांवर मातृछत्र गमावण्याची वेळ आली नसती, अशा शब्दांत दीनानाथ रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेवर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलतांना संताप व्यक्त केला आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केलेला हलगर्जीपणा, योग्य उपचार न दिल्याने २ जुळ्या मुलींना जन्म दिलेल्या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाने पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त यांना या प्रकरणी तथ्य तपासून योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्याचे आणि आयोगास वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.