22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरराज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरू

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरू

सोलापूर – श्री सिध्देश्वर देवस्थानच्यावतीने ग्रामदैवत सिध्देश्वर यात्रेनिमित्त भरविण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी करण्यात येत असून होम मैदानावर प्रदर्शनस्थळावर डोम व मंडप उभारण्याच्या कामाला गती आली आहे. शेतकऱ्यांपर्यंत कृषी व पशु- पक्षी विषयक नवनवीन तंत्रज्ञान पोहोचावे तसेच कृषी उद्योग, उत्पादने व औजारांची खरेदी करता यावी, त्याची प्रात्यक्षिके पाहता यावीत यासाठी दरवर्षी श्री सिध्देश्वर यात्रेचे निमित्त साधून श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीच्यावतीने हे प्रदर्शन महाराष्ट्र शासनाच्या कृषी, आत्मा विभाग व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त सहकार्यातून होत असल्याची माहिती कृषी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष गुरुराज माळगे यांनी दिली.

या प्रदर्शनामध्ये यंदा तीनशेहून अधिक स्टॉलचा समावेश राहणार आहे. कोरडवाहू संशोधन केंद्र सोलापूर, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर, राष्ट्रीय तृणधान्य कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र मोहोळ, महाबीज, खादी ग्रामोद्योग, कृषी औद्योगिक आधारित कृषी-स्टार्टअप, श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना कुमठे व जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने, राष्ट्रीयीकृत व सहकारी बँका, नाबार्ड आदी संस्थांचा या प्रदर्शनामध्ये विशेष सहभाग राहणार आहे.

यंदाच्या प्रदर्शनामध्ये तीनशेहून अधिक कंपन्यांचा समावेश राहणार आहे. प्रदर्शनस्थळी प्री फॅब्रिकेटेड स्टॉल्स, पिलरलेस डोम स्ट्रक्चर राहणार आहे. होम मैदानावर पिलरलेस डोम स्ट्रक्चर, सभामंडप सध्या उभारण्यात येत आहे. खते, औषध, बियाणे, औजारे, यंत्रसामग्री, ट्रॅक्टर्स, फार्म इक्विपमेंट, फलोत्पादन, पॅकेजिंग, साठवणूक, बायोटेक्नॉलॉजी, टिश्यू कल्चर, पाणी व्यवस्थापन, सौरऊर्जा, पशुखाद्य, पोल्ट्री, कृषी अर्थसहाय, कृषी साहित्य, नियतकालिके आदी स्टॉल्स राहणार असल्याचेही माळगे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात येत आहे. पशू व परदेशी भाजीपाला प्रदर्शनही राहणार आहे. स्मार्ट एक्स्पो ग्रुप सांगली यांच्या व्यवस्थापनाखाली यंदा हे कृषी प्रदर्शन भरविण्यात येत आहे. २८ डिसेंबर २०२३ ते १ जानेवारी २०२४ या कालावधीत होम मैदानावर आयोजित या कृषी प्रदर्शनामध्ये यंदाचे खास आकर्षण म्हणजे भारतातील सर्वात उंच देखणा कोसा खिलार जातीचा तब्बल ४१ लाखांचा सोन्या बैल राहणार आहे. तसेच या प्रदर्शनात जगातील सर्वात बुटकी पुगनूर जातीची लहान गायसुध्दा राहणार आहे. याशिवाय कॅट शो, डॉग शो आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धा आदी कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. सिनेअभिनेता क्रांतीनाना मालेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचाही कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR