मॉस्को : वृत्तसंस्था
रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबविण्यासाठी आणि शांततेचा मार्ग काढण्यासाठी अद्यापही प्रयत्न सुरूच आहेत. गेल्या काही दिवसांपासून यात अमेरिकेचे ट्रम्प सरकार विशेष रस घेताना दिसत आहे. या संदर्भात अमेरिका दोन्ही देशांसोबत बोलत असून शांततेचा मार्ग काढण्यासाठी फॉर्म्युला तयार करताना दिसत आहे. यातच आता, या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने एक धक्कादायक प्रस्ताव ठेवल्याचे वृत्त आहे.
यासंदर्भात, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टिव्ह विटकॉफ यांनी युक्रेनचे काही महत्वाचे प्रदेश रशियाला देण्यासंदर्भात भाष्य केले आहे. त्यांनी युक्रेनचे चार प्रदेश रशियाला देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र त्यांच्या या प्रस्तावावरून ट्रम्प प्रशासनातच अंतर्गत मतभेद बघायला मिळत आहेत.
खरे तर, गेल्या आठवड्यातच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी एका व्यक्तीला वॉशिंग्टन येथे पाठवले होते. त्यांनी ट्रम्प प्रशासनासोबत रात्रीचे जेवण घेतले आणि युक्रेन-रशिया शांततेवर चर्चा केली. यानंतर ४८ तासांच्या आतच मॉस्कोसोबतच्या चर्चेचे नेतृत्व करणारे अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी व्हाईट हाऊसमध्ये जाऊन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीही चर्चा केल्याचे वृत्त आहे.
ट्रम्पच्या दुताचा प्रस्ताव…
युक्रेनमध्ये युद्ध थांबवण्याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे, २०२२ मध्ये अवैध पद्धतीने कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यात आलेले पूर्व युक्रेनमधील चार प्रदेशांचा मालकी हक्क रशियाला देण्यात यावा, असे विटकॉफ यांनी म्हटले आहे. याशिवाय, ट्रम्प यांचे विशेष दूत स्टिव्ह विटकॉफ यांनी युद्ध थांबवण्यासाठीचा हा सर्वात जलद मार्ग असल्याचे सांगितले असल्याचे म्हटले आहे.