34.6 C
Latur
Monday, April 14, 2025
Homeमहाराष्ट्र‘असर-२०२४’ अहवाल सादर

‘असर-२०२४’ अहवाल सादर

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचा शाळा सर्वेक्षणाचा अहवाल

मुंबई : प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचा शाळा सर्वेक्षणाचा अहवाल ‘असर-२०२४’ मंगळवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयात सादर करण्यात आला. या अनुषंगाने चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळांनी इयत्ता पहिलीच्या मुलांसाठी राबविलेल्या शाळा पूर्व तयारी मेळावा ‘पहिले पाऊल’ चे कौतुक करुन मुख्यमंर्त्यांनी देशाच्या तुलनेत महाराष्ट्राच्या सद्यस्थितीबाबत समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर भविष्यात शालेय शिक्षणात देशात अग्रेसर राहण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने अधिक प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्यमंर्त्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव डॉ.अश्विनी भिडे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, मुख्यमंर्त्यांचे सचिव श्रीकर परदेशी, महाराष्ट्र राज्य शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या संचालक फरिदा लांबे, फाऊंडेशनचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

अहवालातील ठळक बाबी
प्रथम संस्थेने महाराष्ट्रात ३३ ग्रामीण जिल्ह्यातील ९८७ गावांतील १९,५७३ घरांमधील ३३,७४६ मुलांचे सर्वेक्षण केले. तीन वर्षांच्या पूर्व प्राथमिक शाळेमध्ये नोंदणी असलेल्या मुलांचे प्रमाण २०२२ च्या ९३.९ टक्क्यांच्या तुलनेत २०२४ मध्ये ९५ टक्के इतके आहे. ६ ते १४ वयोगटातील पटनोंदणी दर गेल्या आठ वर्षांपासून ९९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कोरोनाच्या काळात शाळा बंद असूनही २०१८ मधील ९९.२ टक्क्यांवरुन एकूण पटनोंदणीचे आकडे २०२२ मध्ये ९९.६ पर्यंत वाढून २०२४ मध्ये सुद्धा स्थीर आहेत.

पटनोंदणीबरोबरच वाचन, गणित, डिजिटल साक्षरता आदींबाबतही अहवालामध्ये नोंद घेण्यात आली आहे. १४ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये विविध डिजिटल टास्क करण्याचे प्रमाण ८३.४ ते ९२.३ टक्के इतके आहे. इयत्ता तिसरी मधील पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये कोरोना मध्ये झालेला अध्ययन क्षय भरून काढण्यात येत आहे असे दिसून येते. इयत्ता तिसरीतील मुले जी इयत्ता दुसरीच्या पातळीचे वाचन करू शकतात याचे महाराष्ट्राचे प्रमाण देशपातळीपेक्षा १० टक्क्यांनी जास्त आहे.

वय वर्ष १५ ते १६ याच्यामध्ये ९८ टक्के विद्यार्थी हे शाळांमध्ये प्रवेशित आहेत. सर्वात कमी शाळाबा विद्यार्थी असणा-या राज्यांमध्ये महाराष्ट्र हे एक राज्य आहे. वय वर्ष १४ ते १६ मधील विद्यार्थ्यांच्या डिजिटल साधनांची उपलब्धता मध्ये राज्यातील ९४.२ टक्के विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन आहे व यातील ८४.१ टक्के विद्यार्थी त्याचा वापर करू शकतात. यातील ६३.३ टक्के विद्यार्थी हे शिक्षणाच्या संदर्भात स्मार्टफोनचा वापर करतात, अशी नोंदही ‘असर’ अहवालात घेण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR