कोल्हापूर : प्रतिनिधी
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दि. २८ जुलैला कोल्हापूर दौ-यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दौ-याचे नियोजन करण्यात आले. यापूर्वी भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिवाजी विद्यापीठाच्या उद्घाटनासाठी १९६२ ला कोल्हापुरात आले होते. बालकल्याण संकुलाच्या इमारतीचे उद्घाटन त्यावेळी त्यांच्या हस्ते झाले होते.
त्यापूर्वी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या विनंतीवरून त्यांनी उपराष्ट्रपती असताना भक्तिसेवा विद्यापीठ हायस्कूलला १९५५च्या सुमारास भेट दिली होती. त्यानंतर माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि प्रतिभाताई पाटील यादेखील कोल्हापूरला आल्या होत्या. कलाम यांनी वारणेलाही भेट दिली होती. त्यानंतर प्रथमच दीर्घ कालावधीनंतर राष्ट्रपती कोल्हापुरात येत असल्याने त्याबाबत उत्सुकता आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दि. २८ जुलैला सकाळी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतील त्यानंतर वारणेला विविध कार्यक्रमांसाठी जातील. तिथे नेमका काय कार्यक्रम आहे हे गोपनीय ठेवले आहे. सकाळी ११ ते ५ यावेळेत त्या कोल्हापुरात आहेत.