नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवार दि. २ ऑक्टोबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या. पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्ट करत माहिती दिली.
पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत लिहिले खर्गेजी यांच्याशी बोललो. त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सततच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना वैद्यकीय उपचारांसाठी एका दिवसापूर्वी बंगळूरु येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच पेसमेकर प्रत्यारोपण झालेले खर्गे यांची यांची प्रकृती स्थिर असून ते ३ ऑक्टोबरपासून आपले अधिकृत कार्यक्रम पुन्हा सुरू करतील, अशी माहिती त्यांचे सुपुत्र आणि कर्नाटकचे माहिती-तंत्रज्ञान मंत्री प्रियंक खर्गे यांनी दिली आहे. त्यांनी ‘एक्स’ वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की खर्गे यांची पेसमेकर प्रत्यारोपण प्रक्रिया आज सकाळी यशस्वीरित्या पार पडली. ही एक छोटी आणि किरकोळ प्रक्रिया होती आणि यानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते ३ ऑक्टोबरपासून आपले काम पुन्हा सुरू करतील. त्यांच्या नियोजित सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहतील. सर्वांनी दिलेल्या काळजी, समर्थन आणि स्रेहाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.
खर्गेंची ७ ऑक्टोबर रोजी कोहिमात सभा
खर्गे ७ ऑक्टोबर रोजी कोहिमा दौ-यावर जाणार असून नागा सॉलिडॅरिटी पार्क येथे ते जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. नागालँड प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि लोकसभा खासदार एस. सुपोंगमेरेन जामिर यांनी कोहिमा येथील काँग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.