नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेली कठीण परिस्थिती आणि इस्राईल-हमास संघर्षाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्याशी संवाद साधला आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील सद्यस्थिती आणि या क्षेत्रावर आणि जगावर त्याचे होणारे परिणाम यावर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर लिहिले की, दहशतवादी घटना, हिंसाचार आणि नागरिकांचे होणारे नुकसान ही गंभीर चिंतेची बाब आहे. तणाव वाढणे थांबवणे, सतत मानवतावादी मदत सुनिश्चित करणे आणि शांतता आणि स्थैर्य त्वरीत पुनर्संचयित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चाबहार बंदरासह द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी इराणचेही स्वागत केले.
गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल-सिसी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता. यावेळी दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील सद्यस्थिती आणि जगावर त्याचे होणारे परिणाम यावर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी दहशतवाद, हिंसाचार आणि नागरिकांच्या जीवितहानीबद्दल आपली चिंता व्यक्त केली. इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर भारताच्या दीर्घकालीन आणि तत्त्वनिष्ठ भूमिकेचा पंतप्रधानांनी यावेळी पुनरुच्चार केला. पॅलेस्टाईनच्या लोकांसाठी भारताची विकास भागीदारी आणि मानवतावादी मदत पंतप्रधानांनी अधोरेखित केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी शांतता आणि स्थिरता प्रस्थापित होण्याच्या तसेच मानवतावादी मदत सुलभ करण्याच्या आवश्यकतेवर सहमती दर्शविली.