नवी दिल्ली : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ आजपासून सुरु झाला आहे. शपथविधी होताच ट्रम्प यांनी देशात आर्थिक आणीबाणी जाहीर केली आहे. याचबरोबर मेक्सिकोच्या सीमेवरही आणीबाणी लागू केली आहे. अमेरिकेला पुन्हा शक्तीमान, वैभव प्राप्त करून देण्यासाठी देवानेच आपल्याला वाचविल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी शपथ घेताच पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या आहेत. २०१७ नंतर ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचे सर्वोच्च पद स्वीकारले आहे.
अभिनंदन माझ्या प्रिय मित्रा, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या ४७ व्या राष्ट्राध्यक्ष पदी शपथ घेतली. आपल्या दोन्ही देशांच्या फायद्यासाठी आणि जगाचे चांगले भविष्य घडविण्यासाठी मी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास उत्सुक आहे. पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा!, असे मोदी म्हणाले.
सोमवारी शपथविधीपूर्वी ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमधील सेंट जॉन्स एपिस्कोपल चर्चला भेट दिली. यावेळी टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क, अमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस आणि मेटाचे सीईओ मार्क झकरबर्ग हे सोबत होते. शपथविधीला माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा, त्यांच्या कुटुंबातील सदस्य, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि त्यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन यांनीही हजेरी लावली.यावेळी माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश ज्युनियर आणि त्यांच्या पत्नी लॉरा बुश देखील उपस्थित होते.