नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन ठिकाणी जाऊन फोटोशूट करतात. मात्र मणिपूरमध्ये का जात नाही?, असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित केला आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला.
तुम्ही लक्षद्वीपमध्ये जाणून पाण्यात फोटो काढू शकतात, पण मणिपूरमध्ये जाऊन जनतेला समजावू शकत नाहीत? मणिपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली, पण तिथे जाण्याऐवजी पंतप्रधान मोदी समुद्रकिनारी गेले. पोहताना फोटो सेशन केले. पंतप्रधान सगळीकडे फिरत आहेत. मात्र मणिपूरमध्ये ते गेले नाहीत, अशी टीका मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. तसेच गेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी खासदारांच्या निलंबनावर खर्गे म्हणाले, जे खासदार गप्प बसले, त्यांच्यावरही कारवाई झाली. विरोधी पक्षांना संसदेत आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळाली नाही.
खर्गे यांनी आज पत्रकार परिषदेत भारत जोडो न्याय यात्रेच्या लोगोचे प्रकाशन केले. यावेळी खर्गे म्हणाले की, भारत जोडो न्याय यात्रा हे देशवासीयांना आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय मिळवून देण्याच्या दिशेने एक मजबूत पाऊल आहे. आम्ही भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये जात आहोत जेणेकरून आम्हाला त्यांचे म्हणणे ऐकता येईल आणि आमचे विचार मांडता येतील. काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा १४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. विशेष बाब म्हणजे राहुल गांधींनी काढलेल्या या यात्रेची सुरुवात मणिपूरची राजधानी इंफाळ येथून होणार आहे.